सात वर्गांसाठी केवळ तीन शिक्षक
By Admin | Updated: June 30, 2017 01:10 IST2017-06-30T01:10:52+5:302017-06-30T01:10:52+5:30
स्थानिक पंचायत समितीअंतर्गत दामरंचा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीसाठी सात वर्गांना

सात वर्गांसाठी केवळ तीन शिक्षक
संख्या दुप्पट करा : संतप्त पालक शाळेला कुलूप ठोकणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत दामरंचा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीसाठी सात वर्गांना केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. पुरेशा शिक्षकांअभावी येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे पालक आक्रमक झाले असून प्रशासनाने तत्काळ या शाळेत तीन शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा दामरंचा जि. प. शाळेला कुलूप ठोकणार, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पालकांनी प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी थेट पंचायत समिती कार्यालय गाठून संवर्ग विकास अधिकारी म्हैसकर यांना लेखी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दामरंचा जि. प. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. येथे सातही वर्ग मिळून एकूण ८६ विद्यार्थी दाखल आहेत. मात्र या शाळेत केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेचे पदवीधर शिक्षक एच. बी. चांदेकर हे गेल्या दोन वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर आहेत. त्यांना बडतर्फ करून एक नवीन पदवीधर शिक्षक व इतर दोन शिक्षकांची या शाळेत नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. दामरंचा शाळेला तत्काळ तीन शिक्षक न दिल्यास शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, पं. स. सदस्य राकेश पनेला, कैलास कोरेत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतय्या चौधरी, बळवंत तोरेम, राजगोपाल सुरमवार, समितीचे उपाध्यक्ष राजेश्वरी चौधरी, रवी सुरमवार, सुधाकर सडमेक, सजन्ना सुरमवार, पुलय्या बुद्दुलवार, लक्ष्मण झाडे, सागर सुरमवार, दीपाली नैकूल, सुजात सुरमवार, सुमती सुरमवार, लक्ष्मी लिंगम आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक देण्यात येईल, असे आश्वासन बीडीओंनी दिले.