१६८८ गावांसाठी फक्त तीन अग्निशमन बंब

By Admin | Updated: May 17, 2017 01:18 IST2017-05-17T01:18:45+5:302017-05-17T01:18:45+5:30

तब्बल ३५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १६८८ महसुली गावांतील

Only three fire fighting boards for 1688 villages | १६८८ गावांसाठी फक्त तीन अग्निशमन बंब

१६८८ गावांसाठी फक्त तीन अग्निशमन बंब

आगप्रतिबंधक उपाययोजना वाऱ्यावर : १० पैकी एकाही नगर पंचायतीत व्यवस्था नाही
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल ३५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १६८८ महसुली गावांतील नागरिकांना आगीपासून वाचविण्यासाठी केवळ ३ अग्निशमन बंब आहेत. या तीन बंबांच्या भरोशावर जिल्ह्याच्या कोणत्याही गावात जाऊन आग नियंत्रणात आणणे कठीणच नाही तर अशक्य आहे. त्यामुळे आगीच्या घटना घडल्यास जिल्ह्यातील १० लाख ७३ हजार नागरिक असुरक्षित आहेत.
जिल्हाभरात केवळ गडचिरोली आणि देसाईगंज या दोन नगर परिषदांमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. त्यातही गडचिरोली नगर परिषदेच्या दोन अग्निशमन गाड्यांपैकी एक गाडी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे गडचिरोलीतील एक आणि देसाईगंजमधील दोन अशा एकूण तीन अग्निशमन बंबांवर (गाड्यांवर) संपूर्ण जिल्ह्यातील १६८८ गावांमधील आगी विझविण्याची जबाबदारी येऊन पडत आहे.
जिल्ह्यातील ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. अनेक गावांत अजूनही जंगलातील लाकडे आणून चुलीवर स्वयंपाक केला जातो. ग्रामीण भागातील बहुतांश घरेही सिमेंट-काँक्रिटची नसून कुडाची आहेत. त्यामुळे आग लागण्याची शक्यता जास्त असते. शिवाय आग लागल्यानंतर ती झपाट्याने पसरते. अनेक वेळा हवेच्या झोताने ही आग अनेक घरांना कवेत घेण्याची शक्यता असते. अशावेळी २०० किलोमीटवरून अग्निशमन बंब त्या गावात पोहोचेपर्यंत आगीत सर्वकाही स्वाहा होते. अशा परिस्थितीत गावातील लोकांनाच धावपळ करीत बकेटने पाणी मारून ती आग कशीबशी विझवावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांसाठी गडचिरोली आणि देसाईगंज येथील अग्निशमन बंब कुचकामी ठरत आहेत. जिल्हा प्रशासनाने आगीसारख्या आपत्तीतून जिल्हावासीयांना संरक्षण देण्यासाठी तातडीने सर्व नगर पंचायतींमध्ये अग्नीशमन व्यवस्था करणे गरजेचे आहे.

नगर पंचायतींचा निधी गेला कुठे?
जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील सिरोंचा व अहेरी नगर पंचायतींमध्ये अग्निशमन दलाची व्यवस्था व वाहन खरेदीसाठी जिल्हा विकास निधीतून सन २०१५-१६ मध्ये ७५-७५ लाख रुपये निधी देण्यात आला होता. मात्र एक वर्ष होऊन गेले तरी त्या नगर पंचायतींमध्ये अद्याप अग्निशमन वाहन आलेले नाही. त्यामुळे हा निधी गेला कुठे? वाहन खरेदीसाठी एवढा विलंब का? असे प्रश्न अनुत्तरित आहेत.

जिल्ह्यात अग्निशमन यंत्रणा पुरेशा प्रमाणात नाही हे खरे आहे. नगर पंचायतींमध्ये ही व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र अग्निशमन वाहन महागडे राहात असल्यामुळे नगर पंचायतींकडे ते वाहन खरेदीसाठी पैसे नाहीत. त्यामुळे गावकरी स्वत: आपल्या स्तरावर आगी विझवितात.
- कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

अहेरी आणि सिरोंचा नगर पंचायतींना अग्निशमन वाहन खरेदीसाठी २०१५-१६ मध्ये निधी दिला आहे. त्यांनी त्यासाठी टेंडरही बोलविले होते. पण अद्याप वाहन खरेदी झालेली नाही.
- गजेंद्र भोयर, जिल्हा न.पा.प्रशासन अधिकारी

प्रत्येक न.पं.मध्ये व्यवस्था असावी
नगर पंचायत व नगर परिषद अधिनियमान्वये प्रत्येक नगर परिषदांसोबतच प्रत्येक नगर पंचायतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १० नगर पंचायती आहेत. परंतु अद्याप एकाही नगर पंचायतीमध्ये ही व्यवस्था नाही. जिल्ह्यात विविध कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना या व्यवस्थेसाठीच जिल्हा नियोजन समितीकडे पैसे नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Web Title: Only three fire fighting boards for 1688 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.