बोर्डाच्या दक्षता समित्या नावापुरत्याच
By Admin | Updated: March 3, 2016 01:33 IST2016-03-03T01:33:29+5:302016-03-03T01:33:29+5:30
इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाने शाळा, महाविद्यालये व परीक्षा केंद्रस्तरावर दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत.

बोर्डाच्या दक्षता समित्या नावापुरत्याच
कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची होती जबाबदारी
देसाईगंज : इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाने शाळा, महाविद्यालये व परीक्षा केंद्रस्तरावर दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र परीक्षेच्या दरम्यान या समित्या कोणतीही भूमिका पार पाडीत नसल्याने या समित्या केवळ कागदावरच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करून उत्तरे लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉपीवर आळा घालण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात भरारी पथके स्थापन केली जातात. मात्र जिल्ह्याचा व्याप लक्षात घेता, या पथकांना प्रत्येक परीक्षा केंद्राला भेट देणे शक्य होत नाही.
कॉपीला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये याबाबत समुपदेशन केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी प्रत्येक परीक्षा केंद्र, शाळा, महाविद्यालयस्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हाभरात शेकडो दक्षता समित्या स्थापन झाल्या. या दक्षता समित्यांमध्ये गावातील पोलीस पाटील, नगरसेवक, प्रतिष्ठीत महिला, सेवाभावी संस्थांमधील सदस्य यांचा समावेश होता. शाळा सुरू असताना तसेच परीक्षेच्या पूर्वी या दक्षता समित्यांनी कॉपीमुक्त अभियानासाठी विद्यार्थ्यांना प्रबोधन करायचे होते. मात्र सद्यस्थितीत एकाही केंद्रावरची ही समिती सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कॉपी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष घालून दक्षता समित्यांना सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षण खाते झोपेत
कॉपीमुक्त अभियान राबविण्यात दक्षता समित्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे दोन वर्षांपूर्वी दक्षता समित्यांनी दाखवून दिले आहे. मात्र त्यानंतर शिक्षण विभागानेही या समित्यांकडे दुर्लक्ष केले आहे. समितीच्या सदस्यांना परीक्षेपूर्वी शिक्षण विभागाने याबाबत पूर्व कल्पना देणे गरजेचे होते. त्याचबरोबर या सदस्यांना प्रशिक्षण देता आले असते तर अतिशय सोयीचे झाले असते. मात्र शिक्षण विभागाने या समित्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कॉपीमुक्त वातावरणाची निर्मिती करण्यास दक्षता समित्यांनीही हात वर केले आहेत.