वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:15 IST2016-04-25T01:15:22+5:302016-04-25T01:15:22+5:30
यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.

वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक
सर्वत्र अपुरा पाणी पुरवठा : पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त; मे महिन्यात जलसंकट आणखी तीव्र होणार
देसाईगंज : यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी देसाईगंज शहरासह संपूर्ण तालुक्यात नळाद्वारे अपुरा पाणी पुरवठा होत आहे.
देसाईगंज शहराची लोकसंख्या जवळपास ४० हजार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात एका व्यक्तीला ७० लिटर पाण्याची गरज असते. यानुसार देसाईगंज शहरातील ४० हजार लोकसंख्येला दररोज २ कोटी ८ लाख लिटर पाणी पुरवठा करणे अत्यावश्यक आहे. मात्र पाणी टंचाईमुळे सद्य:स्थितीत प्रती दिवस एका व्यक्तीला केवळ १० ते २० लिटर पाणी मिळत आहे. पालिकेच्या वतीने शहरवासीयांना दररोज केवळ आठ लाख लिटर पाणी नळाद्वारे दिले जात आहे. परिणामी पाण्यासाठी नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेच्या वतीने जल प्राधिकरण नळ योजनेत एकूण १७ लाख ५० लिटर पाणी क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीच्या माध्यमातून दिवसातून केवळ एकदाच नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र दिवसातून दोनवेळा पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला अडचणी येत आहेत. नळ कुटुंबधारकांकडे पाण्याची साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्याने दिवसातून एकदा होणारे पाण्याची पूर्णत: साठवणूक होऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेने दिवसातून दोनदा पाणी पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)