केवळ २५ घरकूल पूर्ण

By Admin | Updated: June 29, 2017 02:04 IST2017-06-29T02:04:18+5:302017-06-29T02:04:18+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्याला मिळालेल्या एकूण ५ हजार ७९४ उद्दिष्टांपैकी ५ हजार ७९९ घरकूल मार्च २०१७ अखेर मंजूर करण्यात आले.

Only 25 homes complete | केवळ २५ घरकूल पूर्ण

केवळ २५ घरकूल पूर्ण

तीन महिन्यांत : उद्दिष्ट गाठण्याचे प्रशासनासमोर तगडे आव्हान
दिलीप दहेलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्याला मिळालेल्या एकूण ५ हजार ७९४ उद्दिष्टांपैकी ५ हजार ७९९ घरकूल मार्च २०१७ अखेर मंजूर करण्यात आले. एप्रिलपासून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत केवळ गडचिरोली जिल्ह्यात २५ घरकुलांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. घरकूल बांधकामाची गती प्रचंड कमी असल्याने विहीत वेळेत घरकूल बांधकामाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे प्रशासनासमोर तगडे आव्हान आहे. पहिल्या हप्त्याचे अनुदान घेऊनही शेकडो लाभार्थ्यांनी अद्यापही घरकुलाच्या बांधकामास प्रारंभ केला नसल्याची माहिती आहे.

प्रत्येक सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना तसेच वंचितांना हक्काचे घर मिळावे, यासाठी भाजपप्रणीत केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित केली. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बाराही तालुक्यातील ग्राम पंचायतस्तरावर सुरू आहे. सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याला शासनाकडून एकूण ५ हजार ७९४ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट मिळाले. जिल्हास्तरावरून ५ हजार ७९९ घरकूल मार्च २०१७ अखेर मंजूर करून कार्यारंभ आदेशही संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आले. एप्रिल महिन्यापासून घरकूल बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, गडचिरोली, कोरची, कुरखेडा व अन्य एका तालुक्यात मिळून केवळ २५ घरकूल आतापर्यंत पूर्ण झाले आहेत.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून शासन व प्रशासनाच्या वतीने घरकूल योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र यंत्रणेच्या नियोजन शून्यतेमुळे व लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे घरकूल बांधकामाची गती प्रचंड माघारली आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात अपूर्ण घरकुलाची संख्या वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत अहेरी तालुक्यात १, आरमोरी तालुक्यात ८, चामोर्शी ६, गडचिरोली ४, कोरची २, कुरखेडा २ व अन्य एका तालुक्यात २ असे एकूण २५ घरकुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
आॅनलाईन मंजुरी दिलेल्या एकूण ५ हजार ७९९ घरकुलांपैकी ४ हजार ६८९ घरकुलाच्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे अनुदान अदा करण्यात आले आहे. यामध्ये अहेरी ६६४, आरमोरी ३८८, भामरागड १५६, चामोर्शी ४१९, देसाईगंज १९४, धानोरा ४४३, एटापल्ली ३०१, गडचिरोली २६९, कोरची ४२२, कुरखेडा १५८, मुलचेरा ८१ व सिरोंचा तालुक्यातील ७९४ लाभार्थ्यांचा समावेश आहे. घरकूल बांधकामात बहुतांश तालुके माघारले आहेत.

पावसाळ्यानंतर कामे सुरू होणार
पावसाळ्यात अनेक रेती कंत्राटदार रेतीचा साठा करून ठेवतात. तसेच पावसामुळे रेती उपलब्ध होत नाही. परिणामी तुटवडा निर्माण होऊन रेतीचे भाव वधारतात. याशिवाय पावसाळ्यात शेती मशागतीच्या कामांवर भर दिला जातो. त्यामुळे जुलै महिन्यापासून पावसाळा संपेपर्यंत घरकुलाचे बांधकाम केले जात नाही. त्यामुळे आता जिल्ह्यात पावसाळ्यानंतरच घरकुलाचे काम लाभार्थी हाती घेणार आहेत. दिवाळीनंतर घरकुलाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

११०० वर लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत
ग्राम पंचायतस्तरावर अनेक गावांमध्ये घरकूल मंजूर करण्यात आले. घरकुलाचे कार्यारंभ आदेशही प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र अद्यापही तब्बल १ हजार ११० लाभार्थी पहिल्या हप्त्याच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या लाभार्थ्यांना बांधकामाचे साहित्य खरेदी करणे शक्य झाले नाही. परिणामी अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाच्या कामाला सुरुवात केली नाही. सॉफ्टवेअरमध्ये अडचणी असल्याने आॅनलाईन पद्धतीने घरकूल लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळण्यास विलंब होत आहे.

 

Web Title: Only 25 homes complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.