जिल्हा बँकेच्या एका जागेसाठी एकतर्फी लढत
By Admin | Updated: April 26, 2015 01:58 IST2015-04-26T01:58:30+5:302015-04-26T01:58:30+5:30
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर २० संचालक अविरोध निवडून आले आहे.

जिल्हा बँकेच्या एका जागेसाठी एकतर्फी लढत
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर २० संचालक अविरोध निवडून आले आहे. ओबीसी प्रवर्गाच्या एका जागेसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. ३०९ मतदार दोन उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार असून या मतदार संघात लढत एकतर्फी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या गटाचे १९ संचालक अविरोध निवडून आले आहेत. तर चामोर्शी-मुलचेरा सर्वसाधारण गटातून अमोल गंगाधरराव गण्यारपवार अविरोध निवडून आले आहे. ओबीसी प्रवर्गाच्या गटात एका जागेसाठी अरविंद सावकार पोरेड्डीवार गटाचे भैय्याजी वाढई यांची लढत ज्येष्ठ ओबीसी नेते अरूण पाटील मुनघाटे यांच्यासोबत आहे.
३०९ मतदार असलेल्या या प्रवर्गात नऊ मतदान केंद्रावर रविवारी मतदान होणार आहे. कुरखेडा तालुक्यातून २०, देसाईगंज तालुक्यातून ४९, आरमोरी तालुक्यातून ७२, गडचिरोली तालुक्यातून ६४, धानोरा तालुक्यातून १७, चामोर्शी तालुक्यातून ३९, अहेरी तालुक्यातून २३, एटापल्ली तालुक्यातून १३, सिरोंचा तालुक्यातून १२ असे ३०९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान चालणार असल्याची माहिती जिल्हा निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जयेश आहेर यांनी दिली आहे.
या निवडणुकीची मतमोजणी २७ एप्रिलला सकाळी ९ वाजतापासून ग्रामसेवक भवन गडचिरोली येथे होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)