२० गावे सांभाळतो एक वीज कर्मचारी
By Admin | Updated: November 27, 2015 01:47 IST2015-11-27T01:47:39+5:302015-11-27T01:47:39+5:30
तालुक्याच्या दुर्गम भागात अद्यापही वीज पोहोचली नाही. अशा भागात नागरिक अंधारातच जगत आहेत.

२० गावे सांभाळतो एक वीज कर्मचारी
पाच वर्ष उलटले : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
अहेरी : तालुक्याच्या दुर्गम भागात अद्यापही वीज पोहोचली नाही. अशा भागात नागरिक अंधारातच जगत आहेत. मात्र ज्या गावांमध्ये वीज पोहोचली अशा गावांमध्ये परिसरात वीज कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. हीच स्थिती कमलापूर, छल्लेवाडा, राजाराम वीज उपकेंद्रातील २० गावांवर आली आहे. या भागात वीज देखभाल दुरूस्तीचे काम एक वीज कर्मचारी मागील पाच वर्षांपासून करीत आहे. मात्र येथे कर्मचारी नियुक्त करण्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
राजाराम परिसरात नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होत असतो. परिणामी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रारीनंतर वीज पुरवठा सुरळीत करताना अडचणींचा सामना करावा लागतो. येथे आसुटकर नामक केवळ एकच कर्मचारी असल्याने तो सर्व गावातील वीज पुरवठ्याकडे एकावेळेस लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे परिसरातील गावातील अनेक नागरिकांना एक ते दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागते. काही दिवसांपूर्वी गुड्डीगुडम व छल्लेवाडा येथे तीन वीज कर्मचारी कार्यरत होते. मात्र दोन कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले. तेव्हापासून केवळ एकच वीज कर्मचारी २० गावांचा कार्यभार पाहत आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. परिसरात अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे विजेवर चालणारी अनेक उपकरणे निष्क्रीय ठरतात. रात्रीच्या वेळी मंद प्रकाशात अनेक कामे होऊ शकत नाही. या भागातील छोट्या पाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहोचली नाही. त्यामुळे या भागातील नागरिक अद्यापही अंधारातच जीवन जगत असल्याचे विदारक वास्तव दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)