भूखंड विक्रेत्यास दीड वर्षाचा कारावास

By Admin | Updated: February 28, 2015 01:35 IST2015-02-28T01:35:22+5:302015-02-28T01:35:22+5:30

लेआऊटमधील भूखंडाची विक्री करताना ग्राहकांशी केलेल्या कराराचे पालन न करणाऱ्या एका भूखंड विक्रेत्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दीड वर्षे कारावास

One-and-half year imprisonment for plot seller | भूखंड विक्रेत्यास दीड वर्षाचा कारावास

भूखंड विक्रेत्यास दीड वर्षाचा कारावास

गडचिरोली : लेआऊटमधील भूखंडाची विक्री करताना ग्राहकांशी केलेल्या कराराचे पालन न करणाऱ्या एका भूखंड विक्रेत्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दीड वर्षे कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. राजेंद्र विश्राम दुधे रा. नागपूर (ब्रह्मपुरी) असे शिक्षा झालेल्या इसमाचे नाव आहे.
गडचिरोली तालुक्यातील गोगाव येथे वास्तव्य करणाऱ्या जैमिना अरुण कोटांगले यांनी राजेंद्र विश्राम दुधे यांच्या मालकीच्या श्रीनिवास रियलटर्सच्या आरमोरी येथील भूखंडाची खरेदी करण्यासाठी त्यांच्याशी करारनामा केला. आरमोरी येथील सर्वे क्रमांक ११८२ व १.०६ आराजी असलेल्या लेआऊटमधील ४५७.२५ चौरस मीटर आराजी असलेला चार क्रमांकाचा भूखंड जैमिना कोटांगले यांनी खरेदी केला होता. परंतु दुधे यांनी कराराची पूर्तता केली नाही. त्यामुळे जैमिना कोटांगले यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. त्यावेळी मंचाने २३ आॅगस्ट २०११ रोजी निकाल देऊन दुधे यांना कराराची पूर्तता करावयास सांगितले होते. गैरअर्जदार दुधे याने जैमिना कोटांगले यांच्याकडून भूखंड खरेदीसाठी ३३ हजार रुपये, २६ डिसेंबर २००९ पासून ३ टक्के व्याजदराने स्वीकारून विक्री करावी व कोटांगले यांनी दुधे यांना ३३ हजार रुपये व्याजासह द्यावे तसेच विक्री करून देणे शक्य नसल्यास अर्जदार जैमिना दुधे यांना ८२ हजार रुपये २४ टक्के दराने परत करावे, शिवाय नुकसानीचे २ लाख, मानसिक व शारीरिक त्रास झाल्याचे १० हजार रुपये व तक्रारीचा खर्च १ हजार रुपये द्यावे, असे मंचाने निकालात म्हटले होते. पुढे तक्रार निवारण मंचने दुधे यांना नोटीस बजावून २० मे २०१३ रोजी मंचापुढे बोलावले असता त्याने मंचाने दिलेल्या निर्णयाचे पालन केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी, सदस्य सादिक जव्हेरी व रोझा खोब्रागडे यांनी २५ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणीवर सदर निकाल दिला. अर्जदार जैमिना कोटांगले यांच्यातर्फे अ‍ॅड. संजय शिरपूरकर यांनी काम पाहिले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: One-and-half year imprisonment for plot seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.