जुने कर्मचारी होणार स्थायी
By Admin | Updated: February 10, 2017 02:05 IST2017-02-10T02:05:50+5:302017-02-10T02:05:50+5:30
तालुकास्थळी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर पंचायतीमध्ये पदभरती करण्यासाठी आकृतीबंद तयार केला जाणार आहे.

जुने कर्मचारी होणार स्थायी
माहिती मागविली : ग्रा.पं.मध्ये सेवा बजावलेल्यांना नगर पंचायतीत संधी
प्रतिक मुधोळकर अहेरी
तालुकास्थळी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर पंचायतीमध्ये पदभरती करण्यासाठी आकृतीबंद तयार केला जाणार आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिक्षण व सेवाज्येष्ठतेनुसार सेवेत सामावून घेतले जाणार आहे. यासाठी प्रत्येक नगर पंचायतीकडून कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती मागितली जात आहे.
दीड वर्षांच्या पूर्वी राज्यभरातील तालुकास्तरावर असलेल्या ग्रामपंचायतींचीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार ४ ते २० संख्येपर्यंत कर्मचारी कार्यरत होते. नवीन नगर पंचायतीमध्ये लवकरच कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. नवीन पदे भरताना जुन्या कर्मचाऱ्यांची पदे वगळून भरता यावी, यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांविषयची माहिती विभागीय आयुक्तांनी मागितली आहे. याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांनी ३० जानेवारी रोजी पत्र पाठविले आहे. ग्रामपंचायत असतेवेळी अत्यंत कमी वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगर पंचायतीत स्थायी होण्याची संधी मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संवर्ग विकास अधिकारी यांनी या सर्व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना प्रमाणित करणे आवश्यक आहे. यानंतर सर्व दस्तावेज मुख्याधिकारी जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात १० ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास एकूण ६० कर्मचारी कार्यरत होते. या सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे. राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे, यासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याला आता यश मिळाले आहे.