पुरामुळे अधिकारी भामरागडात अडकले
By Admin | Updated: September 20, 2015 02:00 IST2015-09-20T02:00:12+5:302015-09-20T02:00:12+5:30
१६ सप्टेंबरच्या रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.

पुरामुळे अधिकारी भामरागडात अडकले
चालक वाहकांनाही प्रचंड मनस्ताप : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याही थांबल्या
भामरागड : १६ सप्टेंबरच्या रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांना पूर आल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक जवळजवळ दोन ते अडीच दिवस बंद होती. या कालावधीत नागपूर येथील विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे उपायुक्त श्रीकांत धर्माळे व गडचिरोलीचे जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे दोन दिवस भामरागडातच पुरामुळे अडकून पडले. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या पाच ते सहा बसगाड्याही दोन ते अडीच दिवस अडकून पडल्या होत्या.
१६ सप्टेंबर रोजी उपायुक्त धर्माळे व नियोजन अधिकारी सुटे हे आलापल्ली निसर्ग पर्यटन विकासाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. भामरागड येथेही त्यांना काम असल्याने दोन्ही अधिकारी भामरागड कडे जाण्यास निघाले. मात्र ताडगाव येथील नाल्याला पाणी होते. सदर पाणी काही वेळात ओसरल्यानंतर ते सायंकाळी भामरागडला पोहोचले. मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पर्लकोटा नदीला पूर आला. त्यामुळे भामरागडलगतच्या पुलावर पाणी चढून आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाला. सतत संततधार पाऊस राहिल्याने १७ व १८ सप्टेंबरलाही पूर ओसरला नाही. १८ सप्टेंबरच्या रात्री उशीरा या पुराचे पाणी ओसरल्यावर हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी आलापल्लीकडे रवाना झाले. याच काळात राज्य परिवहन महामंडळाच्या लाहेरी, भामरागड, कोठीकडे गेलेल्या सात ते आठ बसगाड्याही अडकून पडल्या होत्या. जसजसे पुराचे पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. तसे या बसगाड्यांनी भामरागड गाठले व १८ सप्टेंबरच्या रात्री उशीरा या बसगाड्या अहेरीकडे रवाना झाल्या. तब्बल अडीच ते तीन दिवस पुरामुळे एसटीवाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. भामरागड जवळचा ठेंगण्या पुलावर वारंवार पाणी येत असल्याने हा मार्ग बंद होतो.