अधिकाऱ्यांनी शिष्यवृत्ती रक्कम देण्यासाठी कमिशन लाटले

By Admin | Updated: March 1, 2015 01:38 IST2015-03-01T01:38:13+5:302015-03-01T01:38:13+5:30

गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात अटकेत असलेले गडचिरोली प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके

The officials looted the commission to pay scholarships | अधिकाऱ्यांनी शिष्यवृत्ती रक्कम देण्यासाठी कमिशन लाटले

अधिकाऱ्यांनी शिष्यवृत्ती रक्कम देण्यासाठी कमिशन लाटले

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात अटकेत असलेले गडचिरोली प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके व सामाजिक न्याय विभागाचे गडचिरोली येथील सहायक आयुक्त तुकाराम बरगे यांना शिष्यवृत्ती रक्कम मंजूर करून देण्यासाठी ३० टक्क्यापेक्षा अधिक रक्कम लाच म्हणून अनेकदा दिली, असा खळबळजनक गौप्यस्फोट या घोटाळ्यात अडकलेल्या अनेक संस्थाचालकांनी केला आहे. त्यामुळे बरगे व मेंडके यांच्या संपत्तीची चौकशी राज्य शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत १८ कोटी रूपयाचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आला आहे. तर सामाजिक न्याय विभागाचे सहायक समाज कल्याण आयुक्त तुकाराम बरगे यांच्याकडे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा प्रभार होता. बरगे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये ६९ हजार १४३ विद्यार्थ्यांना ८७ कोटी २५ लाख २० हजार तर गडचिरोली जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये २२ हजार ७९२ विद्यार्थ्यांना २१ कोटी २२ लक्ष २३ हजार रूपयें वाटप केले. दोन जिल्ह्यात ८१ हजार ९३५ विद्यार्थ्यांना १०८ कोटी ४७ लाख ४३ हजार रूपये वाटप केले आहे. बरगे यांनी सन २०१३-१४ मध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षाकरिता सदर निधी खर्च केला, अशी माहिती आहे. या सर्व रक्कमांच्या वाटपापोटी ३० टक्के कमिशन हे दोन्ही अधिकारी संस्थाचालकांकडून घेत होते, अशी माहिती आता अनेक संस्थाचालक देऊ लागले आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या ११ संस्थाचालक व प्राचार्यांनी ३० टक्के कमिशन या दोन्ही अधिकाऱ्यांना दिले होते, अशी माहिती पुढे आली आहे. बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर शिष्यवृत्ती उचल करण्याच्या कामात समाज कल्याण विभाग व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, लिपीक, लेखापाल या प्रत्येकाच्या टेबलावर पैसा वाटप करावा लागत होता. ३० टक्क्याच्या वरच कमिशन हे लोक खात होते. गेल्या तीन ते चार वर्षांत या दोन्ही अधिकाऱ्यांनी आघाडी सरकारातील एका मंत्र्याला येथून प्रचंड प्रमाणात रसद पुरविली, अशी माहिती घोटाळ्यात अडकलेल्या महाविद्यालयाचे संस्थाचालकच आता देत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The officials looted the commission to pay scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.