अधिकाऱ्यांच्या चुका शिक्षकांच्या मुळावर
By Admin | Updated: May 14, 2017 01:52 IST2017-05-14T01:52:07+5:302017-05-14T01:52:07+5:30
समायोजन व पदोन्नतीच्या याद्या तयार करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी

अधिकाऱ्यांच्या चुका शिक्षकांच्या मुळावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : समायोजन व पदोन्नतीच्या याद्या तयार करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी विशेष काळजी घेत नसल्याने सदोष याद्या तयार केल्या जात आहेत व या याद्यांना उच्च न्यायालयात आव्हान देऊन न्यायालयाच्या स्थगितीनंतर बदल्यांची प्रक्रिया थांबविली जात आहे. शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे बदल्या रखडत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कार्यकाळात सन २०१४ मध्ये बोगस शिक्षक बदली प्रकरण घडले होते. या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर बदली प्रक्रिया थांबली होती. २०१५ मध्ये न्यायालयाच्या निर्देशानंतर बदल्या करण्यात आल्या. २०१६ मध्ये पेसा गावांची अंतिम यादी तयार झाली नव्हती. त्यामुळे मागील वर्षीसुद्धा बदल्या झाल्या नाही. फेब्रुवारी महिन्यात विषय शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. तर शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे समायोजन करण्यात आले. मात्र विषय शिक्षकांच्या पदोन्नतीची यादी योग्य पद्धतीने बनविण्यात आली नाही. त्यामुळे याही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. परिणामी न्यायालयाने समायोजनाला स्थगिती दिली आहे.
२०१७ मध्ये बदल्या होतील, अशी अपेक्षा शिक्षक वर्ग बाळगून होता. मात्र समायोजनच रखडल्याने यावर्षीसुद्धा बदल्या होणार नाही, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी दरवर्षी चुकीच्या पद्धतीने समायोजन व पदोन्नतीच्या याद्या तयार करीत आहेत. याचा फटका शिक्षकांना बसत चालला आहे. बदल्या रद्द होत असल्याने दुर्गम भागात कार्यरत असलेले शिक्षक कासावीस झाले आहेत. त्यांनी ९ मे पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणही सुरू केले आहे. या शिक्षकांनी विज्ञान पदवीधारक झालेल्या शिक्षकांच्या पदवीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी विज्ञान पदवीधारकांच्या पदवीची चौकशी करण्याचे आश्वासन दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटनेला दिले होते. यावर विज्ञान पदवीधारक शिक्षकांनी केवळ विज्ञान पदवीधारकांची चौकशी न करता सर्व प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्याही शैक्षणिक अर्हतेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावरून शिक्षकांमध्येच बदल्यांवरून वादविवाद व मतभेद असल्याचे दिसून येत आहे. बदल्यांची प्रक्रिया दरवर्षी रखडत असल्याने दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेले शिक्षक मागील अनेक वर्षांपासून त्याच भागात खितपत पडले आहेत. हा त्यांच्यावरील एकप्रकारचा अन्याय आहे. दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात निर्माण झाली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.