सभागृहात कार्यालय; वऱ्हांड्यात सभा
By Admin | Updated: September 11, 2015 01:41 IST2015-09-11T01:41:55+5:302015-09-11T01:41:55+5:30
नक्षली नेता किसन याच्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी २९ नोव्हेंबर २००५ रोजी वैरागड येथील ग्राम पंचायत कार्यालयाची जाळपोळ केली होती.

सभागृहात कार्यालय; वऱ्हांड्यात सभा
१० वर्षांपूर्वी नक्षल्यांनी जाळली इमारत : वैरागड ग्राम पंचायत इमारतीचे बांधकाम रखडले
वैरागड : नक्षली नेता किसन याच्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी २९ नोव्हेंबर २००५ रोजी वैरागड येथील ग्राम पंचायत कार्यालयाची जाळपोळ केली होती. या घटनेत ग्राम पंचायत कार्यालयाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या घटनेनंतर वैरागड येथील ग्राम पंचायतीचा कारभार ग्राम पंचायत सभागृहात चालत होता. एका कोपऱ्यात ग्राम पंचायतीचा कारभार तसेच उर्वरित भागात मासिक सभा व ग्राम सभेचे आयोजन केले जात होते. मात्र दोन महिन्यांपूर्वी रूजू झालेल्या नवीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संपूर्ण सभागृहात ग्राम पंचायत कार्यालय थाटल्याने ग्राम सचिवालयाच्या वऱ्हाड्यांत सभा घ्यावी लागत आहे.
नक्षलवाद्यांकडून ग्राम पंचायत कार्यालयाची जाळपोळ केल्यानंतर वैरागड येथे नवीन ग्राम पंचायतीचे बांधकाम व्हावे, यासाठी जिल्हा परिषद सभापती व सदस्यांना वारंवार जि. प. च्या बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला. ग्राम पंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी जाळलेली इमारत निर्लेखित करून नवीन इमारत बांधण्यासाठी मोजमाप करण्यात आले. मात्र त्यानंतर इमारतीचे बांधकाम पुढे सरकले नाही. ग्राम पंचायत कामकाज आणि ग्रामसभा एकाच ठिकाणी घेतल्या जात आहेत. मात्र सभा ग्राम सचिवालयाच्या वऱ्हाड्यांत खाली सतरंजी टाकून घ्यावी लागत आहे. ग्राम पंचायत कार्यालयाची नासधूस होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला. ग्राम पंचायतीच्या इमारत बांधकामासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही वैरागड येथे ग्राम पंचायतीची इमारत बांधण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दहा वर्षांपूर्वी नक्षल्यांनी ग्राम पंचायत कार्यालयाची इमारत जाळून नासधूस केली होती. त्यानंतर नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मोजमापही करण्यात आले होते. मात्र सदर काम अद्यापही मार्गी लावण्यात आले नाही. परिणामी येथील ग्रामसभेसाठी अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)