पालकमंत्र्याच्या नगरीत कार्यालय ओस
By Admin | Updated: December 30, 2014 23:36 IST2014-12-30T23:36:09+5:302014-12-30T23:36:09+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र पालकमंत्री अहेरी भागातील असतानाही या भागात शासकीय कार्यालय कर्मचाऱ्याअभावी सध्या

पालकमंत्र्याच्या नगरीत कार्यालय ओस
अहेरी : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र पालकमंत्री अहेरी भागातील असतानाही या भागात शासकीय कार्यालय कर्मचाऱ्याअभावी सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. अहेरी उपविभागातील आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. लेखा विभाग वगळता भांडार, यांत्रिकी, संगणक, प्रशासन आदी विभागात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नव्हती. विजेचे दिवे व पंखे मात्र सुरू होते. हे कार्यालय पूर्णत: रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
या संदर्भात कार्यकारी अभियंता यांना विचारणा करण्यासाठी मंगळवारी प्रयत्न करण्यात आला. तर त्यांनी कर्मचारी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर येथून येत असल्याने ते सोमवारी उशीरा येतात, असे सांगून या कर्मचाऱ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. अहेरी भागाचे आमदार राज्याचे मंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांच्या मतदार संघात जर कार्यालयाची अशी अवस्था असेल तर तर जिल्ह्याच्या अन्य कार्यालयाचा विचार न केलेलाच बरा, अशी भावना या परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात बायोमॅट्रीक थंबमशीन देण्यात आली आहे. मात्र ती धुळखात आहे. त्यामुळे कर्मचारी वाटेल तेव्हा येतात व वाटेल तेव्हा जातात, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)