आक्रमक गैरआदिवासी रस्त्यावर
By Admin | Updated: January 19, 2016 01:13 IST2016-01-19T01:13:22+5:302016-01-19T01:13:22+5:30
ओबीसी व इतर प्रवर्गातील जातनिहाय जनगणना २०११ ची आकडेवारी तत्काळ जाहीर करावी, ओबीसींना

आक्रमक गैरआदिवासी रस्त्यावर
गडचिरोली : ओबीसी व इतर प्रवर्गातील जातनिहाय जनगणना २०११ ची आकडेवारी तत्काळ जाहीर करावी, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष कृती समिती व विविध गैरआदिवासी संघटनांच्या वतीने सोमवारी येथील इंदिरा गांधी चौकातून जवळपास दोन हजार लोकांचा मोर्चा जिल्हा कचेरीवर काढण्यात आला. दरम्यान गडचिरोली शहरातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. या मोर्चाच्या निमित्ताने सरकारच्या विरोधात संतप्त गैरआदिवासींचा आक्रमक पवित्रा रस्त्यावर दिसून आला.
सर्व पक्षीय या विशाल मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार, ओबीसी संघर्ष समितीचे अरूण मुनघाटे, प्रा. शेषराव येलेकर, बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, प्रा. राजेश कात्रटवार, रमेश चौधरी, हेमंत जंबेवार, पंकज गुड्डेवार, प्रशांत वाघरे, महेंद्र ब्राह्मणवाडे, आशिष पिपरे यांनी केले.
संतप्त गैरआदिवासींचा मोर्चा येथील इंदिरा गांधी चौकातून १२.३० वाजता जिल्हा कचेरीकडे निघाला. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १.१५ वाजता पोहोचला.
याप्रसंगी अरूण मुनघाटे, प्रा. शेषराव येलेकर, बाबुराव कोहळे आदीसह प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात दादाजी चापले, रमेश मडावी, बाबुराव बावणे, दादाजी चुधरी, गोवर्धन चव्हाण, प्रभाकर वासेकर, रवींद्र वासेकर, बंडू शनिवारे, प्राचार्य खुशाल वाघरे, भास्कर बुरे, नंदू नाकतोडे, रिंकू पापडकर, पांडुरंग घोटेकर, नितेश राठोड, विवेक ब्राह्मणवाडे, संजय शिंगाडे, मंदीप गोरडवार, केशव सामृतवार, लीलाधर भरडकर, भावना वानखेडे, प्रतिभा चौधरी, पुष्पा लाडवे, नंदकिशोर भैसारे, युवराज बोरकुटे, पुरूषोत्तम म्हस्के, गुरूदेव भोपये, प्रकाश डोईजड, नंदू वैरागडे, राहूल नैताम, संजय पोहणेकर, रमेश बारसागडे, शैलेश बरडे, संतोष बोलुवार, प्रा. भास्कर नरूले, नरेंद्र गजपुरे, रूपेश उडाण, उमेश दुधबळे, रजनीकांत मोटघरे, भजन मोहुर्ले, प्रा. देवानंद कामडी आदीसह हजारो गैरआदिवासी नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान इंदिरा गांधी चौक व कॉम्प्लेक्स परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त होता. (स्थानिक प्रतिनिधी)
आरमोरीच्या आमदाराचे भाषण मोर्चेकऱ्यांनी पाडले बंद
४आ.विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींना सर्व क्षेत्रातून बाद करण्याचे मनुवाद्यांचे षडयंत्र आहे. पुढच्या निवडणुकीत ओबीसींनी मतदानावर बहिष्कार घालून कोणत्याही विद्यमान व माजी आमदार, खासदारांना जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांच्या भाषणानंतर आरमोरीचे आ. क्रिष्णा गजबे भाषण देण्यासाठी उभे राहिले. आपण स्वत: व खा. अशोक नेते, आ. डॉ. होळी, आ. विजय वडेट्टीवार व अन्य नेत्यांनी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले, कोणकोणाची भेट घेतली, याविषयी आ. गजबे माहिती सांगत असतानाच उपस्थित युवक मोर्चेकऱ्यांनी आ. गजबे यांना ‘आरक्षण पूर्ववत कुठे झाले ते दाखवा, नोकरभरतीत आम्हाला स्थान मिळाले काय ते दाखवा, धानाला भाव मिळाला काय, ते सांगा’, असे जोरजोराने ओरडून आ.गजबे यांना जाब विचारला. यामुळे आ. गजबे यांना भाषण बंद करावे लागले. त्यानंतर आ. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मागण्या : ओबीसी, भटके विमुक्त यांच्याकरिता स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी, राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी काढलेल्या नोकर भरतीसंदर्भातील पेसा अधिसूचनेत सुधारणा करून स्थानिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरीची संधी द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना पाचवीपासून शिष्यवृत्ती लागू करावी, सर्व अभ्यासक्रमांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, ओबीसीसाठी असणारी नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, वनहक्क जमिनीसाठी इतर शेतकऱ्यांना असणारी तीन पिढ्यांची अट रद्द करावी, इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल योजनेमध्ये ओबीसींना लोकसंख्येच्या आधारावर घरकूल मंजूर करावे, मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा व विभागस्तरावर आश्रमशाळा, शासकीय निवासी शाळा, वसतिगृहांची व्यवस्था करावी, ओबीसी भूमिहीन शेतकऱ्यांसाठी पाच एकर जमीन उपलब्ध करून द्या.
दुपारपर्यंत कडकडीत बंद
४गडचिरोली शहरात सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. मोर्चा जिल्हा कचेरीकडे गेल्यानंतर प्रतिष्ठाने उघडली. तर अनेक शाळा व महाविद्यालयांना या मोर्चामुळे सुटी देण्यात आली होती.