गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला आहे. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविण्याची मागणी आहे.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सुटीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
आरमाेरी : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे खड्डे खोदले आहेत.
शाळेच्या आवारातील विद्युत तारा हटवा
अहेरी : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीवरून गेलेल्या विद्युत तारांमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. या विद्युत तारा काढण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये याकरिता तारा हटवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र, याकडे ‘महावितरण’चे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या वेळी मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वनजमिनीवर अतिक्रमणांत वाढ
आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागांत अनेक नागरिकांनी वनजमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे.
सिंचन विहिरीऐवजी बोअर खोदून द्या
चातगाव : शासनामार्फत बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदून देण्यात आल्या आहेत. मात्र, या विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. या विहिरींना बोअरची गरज आहे.
प्रसुती रजा मंजुरीच्या प्रतीक्षेत
एटापल्ली : महिला कर्मचाऱ्यांना गरोदरपणा व प्रसुती काळासाठी ६ महिने म्हणजे १८० दिवसांची भरपगारी रजा दिली जाते. मात्र, प्रसुती रजा घेतलेल्या अनेक महिलांचे प्रसुती रजा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले नाहीत.
मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण
आरमोरी : सायगाव मार्गावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून, या मार्गावर जागोजागी लहान-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचे कित्येकदा अपघात झाले आहेत. रात्रीच्या सुमारास हा मोठा खड्डा दुचाकीस्वारांना दिसत नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. अशाप्रकारचे खड्डे या मार्गावर अनेक ठिकाणी आहेत.
पोर्ला बसस्थानकावर अपघाताची शक्यता
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील वर्दळीचे गाव असलेल्या पोर्ला येथे गतिरोधकाची नितांत गरज आहे. पण ते नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे गतिरोधक उभारावे, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मुत्रीघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. नगरपरिषदेने शहरातील मुख्य ठिकाणी सार्वजनिक मुत्रीघर बांधण्याची गरज आहे.
मूलभूत समस्या साेडविण्याची मागणी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही कमलापूर भागातील समस्या मार्गी लागल्या नाहीत.
पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याच पशुपालकांकडे हाडकुळ्या गाई व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहे. मात्र, ते खरेदी करण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याने पशुपालकांची अडचण झाली आहे. पशुधन पाळण्यापेक्षा शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळत आहे.
अनावश्यक फलकाने साैंदर्यीकरणात बाधा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे.
ट्रॅक्टरचालकांच्या परवान्यावर प्रश्नचिन्ह
एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण मद्यप्राशन करून ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात पाच ते दहा नागरिकांचा मागील पाच वर्षांत मृत्यू झाला आहे.
घोट-रेखेगाव मार्ग उखडला
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. सदर मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या भागातील रस्ता विकासाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.
इंदिरा गांधी चाैकात स्वच्छतागृह द्या
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागतात. या ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरचीतील रस्ते खड्डेमय
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरूस्ती करण्याची मागणी आहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.
दत्तमंदिर दुर्लक्षित
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे मंदिर आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष असून, मंदिर विकासापासून अजूनही दुर्लक्षितच आहे. येथे सुविधा देण्याची मागणी भाविकांकडून हाेत आहे.
शिधापत्रिका मिळेना
कुरखेडा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना शिधापत्रिका मिळाली नसल्याने अजूनही ते वंचित आहेत. तहसील कार्यालयात परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतरही तालुक्यातील एपीएल नागरिकांना शिधापत्रिका देण्यात आल्या नाहीत.