ओबीसींचा १८ ला मोर्चा
By Admin | Updated: January 15, 2016 02:07 IST2016-01-15T02:07:31+5:302016-01-15T02:07:31+5:30
ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

ओबीसींचा १८ ला मोर्चा
१६ ला बंदचे आवाहन : सर्वच संघटनांचा आंदोलनाचा निर्धार
गडचिरोली : ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी १६ जानेवारी रोजी गडचिरोली शहर वगळता इतर सर्वच तालुक्यांमध्ये बंदही पाळण्यात येईल, अशी माहिती ओबीसी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
ओबीसी, भटक्या, विमुक्त या प्रवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, ओबीसी व इतर प्रवर्गातील जातनिहाय जनगणनेची आकडेवारी तत्काळ जाहीर करावी, राज्यपालांनी काढलेली अधिसूचना रद्द करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना पाचवीपासून शिष्यवृत्ती लागू करावी, सर्व अभ्यासक्रमांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, नॉनक्रिमिलिअरची अट रद्द करावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना आरक्षण द्यावे, वनहक्क जमिनीसाठी शेतकऱ्यांना असलेली तीन पिढ्यांची अट रद्द करावी, इंदिरा आवास योजनेंतर्गत ओबीसी समाज बांधवांना लोकसंख्येच्या प्रमाणात घरकूल मंजूर करावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दुर्गम भागात मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आश्रमशाळा उघडण्यात याव्या, भूमिहीन शेतकऱ्यांसाठी पाच एकर जमीन उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर १८ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये ओबीसी, भटक्या व विमुक्त जमातीच्या जवळपास सर्वच संघटना सहभागी होणार आहेत. या मोर्चाला इतरही प्रवर्गाच्या संघटनांनी भक्कम पाठिंबा दर्शविला आहे.
पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष समितीचे ज्येष्ठ नेते अरूण मुनघाटे, प्रा. शेषराव येलेकर, दादाजी चापले, प्रभाकर वासेकर, नगर परिषद बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार, न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, रमेश मडावी, नारायण म्हस्के, विलास भुरे, गोवर्धन चव्हाण, प्रवीण घाटे, रवींद्र वासेकर, बाबुराव बावणे, विवेक बाबनवाडे, पांडुरंग घोटेकर, रामू म्हस्के, महेंद्र बाबनवाडे, गुरूदेव भोपये, नंदू कायरकर, बंडू सोनवाने, पांडुरंग कातरकर, लिलाधर भरडकर, नागेश आभारे, आशिष पिपरे, उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)