एकता नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर

By Admin | Updated: April 24, 2017 01:09 IST2017-04-24T01:09:43+5:302017-04-24T01:09:43+5:30

गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे.

OBC lacking in every area due to unity | एकता नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर

एकता नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर

ओबीसी युवा महोत्सव : योगीता भांडेकर यांचे प्रतिपादन
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे. ओबीसींमध्ये एकतेची भावना नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात मागे पडत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.
ओबीसी युवा महोत्सवाचे उद्घाटन गोकुलनगर येथील शिवाजी हायस्कूलच्या सभागृहात रविवारी करण्यात झाले. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील मुनघाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले, युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना योगीता भांडेकर म्हणाल्या, देशात ५२ टक्के ओबीसी असताना ओबीसीमध्ये एकतेची भावना नाही. त्यामुळे संघटन कमी पडत आहे. एकाच शाळेत एकाच बेंचवर बसणाऱ्या एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेश दिल्या जाते. मात्र ओबीसी विद्यार्थ्यांना या साहित्यापासून वंचित केले जाते. त्यामुळे खऱ्या अर्थाने येथूनच जातीभेदाची सुरूवात होते. जि.प. अध्यक्ष या नात्याने आपण जिल्ह्यातील ओबीसींच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेश शासनाकडून मिळण्याकरिता आपण प्रयत्न करणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या प्रश्नांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना राज्यात झाल्यामुळे ओबीसींच्या विविध समस्या मार्गी लागणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या गावांमध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे. मात्र चुकीच्या सर्वेक्षणाने संबंधित गाव पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील ओबीसींवर अन्याय झाला आहे. या संदर्भात आमसभा व ग्रामसभांचे प्रस्ताव आमच्याकडे पोहोचले आहेत. सदर प्रस्तावाला घेऊन शासन दरबारी अशा गावांना पेसा क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रयत्न करणार असे डॉ. होळी यांनी सांगितले. प्रा. शेषराव येलेकर म्हणाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या रेट्यामुळेच राज्यात ओबीसी मंत्रालय स्थापन झाले.मात्र या मंत्रालयाला लोकसंख्येच्या प्रमाणात पर्याप्त निधी उपलब्ध न झाल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा मोठे आंदोलन करावे लागेल, असेही प्रा. येलेकर यांनी सांगितले. याप्रसंगी अरूण मुनघाटे, दादाजी चापले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक बांदूरकर, संचालन अक्षय ठाकरे यांनी केले तर आभार नयन कुनघाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला नगरसेवक रमेश भुरसे, श्याम वाढई, प्राचार्य सुरेश डोंगे, पांडुरंग घोटेकर, दादाजी चुधरी, पी. पी. म्हस्के, त्र्यंबक करोडकर, राजेंद्र उरकुडे, पी. टी. देशमुख, प्राचार्य मने, देव्हारे, हरीभाऊ बुरडकर, मत्ते, तुषार वैरागडे, राहूल भांडेकर, अतुल वाढई, शुभम बांगरे, चेतन शेंडे, शिवानी मोहुर्ले आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळच्या सुमारास कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. २४ एप्रिल रोजी सोमवारला या ठिकाणी बुध्दीबळ स्पर्धा घेतली जाणार असून सायंकाळी समुह नृत्य स्पर्धा होईल.

Web Title: OBC lacking in every area due to unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.