आरक्षण मुद्यावर ओबीसी आक्रमक
By Admin | Updated: December 8, 2014 22:33 IST2014-12-08T22:33:57+5:302014-12-08T22:33:57+5:30
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, राज्यपालांची पेसा कायद्याची अधिसूचना रद्द करावी,

आरक्षण मुद्यावर ओबीसी आक्रमक
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद; शासनाविरोधात नारेबाजी
गडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, राज्यपालांची पेसा कायद्याची अधिसूचना रद्द करावी, नॉनक्रिमीलेयरची मर्यादा ६ लाखापर्यंत वाढवावी, आदीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी ओबीसींच्या विविध संघटनांच्या वतीने गडचिरोलीसह आरमोरी, चामोर्शी, अहेरी आदी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद आंदोलन करण्यात आले़
सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण ६ टक्क्यांवर आणले आहे़ शिवाय अनुसूचित क्षेत्रात वर्ग ३ व ४ ची नोकर•भरती करताना पूर्णपणे आदिवासी उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे़ तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नॉन क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांवरून ६ लाख करावी तसेच ओबीसींची थकीत असलेली ११०० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती़ परंतु पुढे काहीच झाले नाही़ त्याअनुषंगाने ओबीसी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा घाट राज्य शासनाने घातल्याचा आरोप ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी कर्मचारी असोसिएशन, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सुशिक्षीत बेरोजगार संघटना व अन्य गैरआदिवासी संघटनेच्यावतीने आज सोमवारी गडचिरोली जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले़
आज सकाळी ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा़ शेषराव येलेकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरुण मुनघाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले यांच्यासह प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, प्रभाकर वासेकर, दादा चुधरी, गणेश वसू, प्रवीण म्हशाखेत्री, रत्नदीप म्हशाखेत्री, भास्कर बुरे, संतोष बोलुवार आदींनी गडचिरोली येथील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ती बंद करायला लावली़ आज सकाळी खासगी शाळा, महाविद्यालये सुरू होती़ परंतु आंदोलनकर्त्यांनी धडक दिल्यानंतर सकाळच्या शाळेला सुटी देण्यात आली़ त्यानंतर दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात आल्या़
त्यानंतर विविध ओबीसी संघटनांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांचेकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. सदर निवेदनाची प्रती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, महसूलमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठविण्यात आली आहे. आंदोलनात लोकनेते नामदेव गडपल्लीवार यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव सहभागी झाले होते.