नर्सिंगचे शिक्षण पूर्ववत सुरू व्हावे!
By Admin | Updated: March 1, 2017 01:36 IST2017-03-01T01:36:55+5:302017-03-01T01:36:55+5:30
चातगाव येथील डॉ. नर्सिंग कॉलेज परिसरात असलेल्या वसतिगृहावर २२ फेब्रुवारी रोजी दगडफेक करण्यात आली

नर्सिंगचे शिक्षण पूर्ववत सुरू व्हावे!
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा : स्टुडंट नर्सिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
गडचिरोली : चातगाव येथील डॉ. नर्सिंग कॉलेज परिसरात असलेल्या वसतिगृहावर २२ फेब्रुवारी रोजी दगडफेक करण्यात आली. यामुळे विद्यार्थिनी भितीपोटी स्वगावी परतल्या. तेव्हापासून नर्सिंग कॉलेजमधील शिक्षणाची प्रक्रिया बंद पडली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी सदर कॉलेजमधील नर्सिंगचे शिक्षण पूर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्टुडंट नर्सिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व विद्यार्थिनींनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला स्टुडंट नर्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष निलीमा अंबादे, सचिव श्रीदेवी बारसागडे, सहसचिव भारती सडमेक यांच्यासह नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, नर्सिंगच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०१७ ही आहे. तसेच नर्सिंग अभ्यासक्रमाची परीक्षा १ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. आमचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सदर नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह पूर्ववत सुरू करून आम्हा विद्यार्थिनींना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थिनींनी यावेळी केली. दरम्यान जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना प्रत्यक्ष भेटून शैक्षणिक नुकसानीचा मुद्दा त्यांच्यापुढे मांडला. यावर विद्यार्थिनींच्या शिक्षणाची, निवासाची तसेच इतर सुविधा करून सदर महाविद्यालयाची शिक्षण प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात येईल. मात्र या कार्यवाहीला वेळ लागेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नायक यांनी आम्हा विद्यार्थिनींना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाशी संपर्क साधला, अशी माहिती असोसिएशनच्या अध्यक्ष अंबादे यांनी पत्र परिषदेत दिली.