स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या वाढली
By Admin | Updated: August 10, 2016 01:44 IST2016-08-10T01:44:06+5:302016-08-10T01:44:06+5:30
तालुक्यातील वघाळा जुना येथे दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी स्थलांतरीत पक्षी येतात.

स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या वाढली
पर्यटन स्थळ म्हणून उपेक्षित : वघाळा जुना येथील वैनगंगा नदीतीरावर वास्तव्य
महेंद्र रामटेके आरमोरी
तालुक्यातील वघाळा जुना येथे दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी स्थलांतरीत पक्षी येतात. जून व जुलै महिन्यात गावातील चिंचेच्या झाडावर घरटी बांधून, अंडी घालून पिल्ल्यास जन्म देतात. ही परंपरा गेल्या ३०-४० वर्षांपासून कायम आहे. यावर्षीसुद्धा स्थलांतरीत पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या ८ ते १० हजारांच्या आसपास आहे. मात्र स्थलांतरीत पक्ष्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वघाळा हे पक्षी पर्यटन स्थळ म्हणून आजही उपेक्षित आहे.
आरमोरीजवळील वैनगंगा नदीतीरावर जुना वघाळा गाव वसलेले आहे. हे गाव पूर बाधित आहे. या गावात चिंचेच्या झाडांची संख्या जवळपास ५० वर आहेत. नदीकिनारा, शेत आणि चिंचेचे मोठे झाड यामुळे नैसर्गिक सौंदर्य या गावाला लाभले आहे. या गावात स्थलांतरी पक्ष्यांचा ओघ वाढलेला आहे.
पाणी आणि चाऱ्याची मुबलकता या गावात असल्यामुळे दरवर्षी पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या गावात विविध जातीचे विदेशातून आलेले पक्षी गुण्यागोविंदाने राहत आहेत. गावातील संपूर्ण चिंचेचे झाड पक्ष्यांच्या थव्यांनी वेढलेले आहे. स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांनी झाडावर घरटी बांधून व अंडी घालून पिल्ल्यांना जन्म दिला. त्यामुळे पक्ष्यांची संख्या जवळपास ८ ते १० हजारांपर्यंत पोहोचली आहे.
स्थलांतरीत पाहुण्या पक्ष्यांचे गाव म्हणून वघाळा जुना या गावाची ओळख निर्माण झाल्याने दरवर्षी पक्षी मित्र व बाहेरील अनेक लोक पक्षी पाहण्यासाठी या गावाला भेटी देत असतात. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षी असलेले गाव पक्षी पर्यटन स्थळ म्हणून आजही उपेक्षित आहे.
वघाळा जुना गावातील विकासात्मक कामे पूर्ण करून नव्याने निधी देण्यात यावा, तसेच पक्षी पर्यटन स्थळ म्हणून या गावाला घोषित करावे, अशी मागणी वन्यजीव पक्षी संरक्षण समितीचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, रामकृष्ण धोटे, संदीप प्रधान, धनराज दोनाडकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. शासन व प्रशासनाने वघाळा गावाला पर्यटन स्थळ घोषित करून विकास करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे.
निधीअभावी पार्कचे काम रखडले
गावातील नागरिक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करीत आहेत. त्यामुळे पक्ष्यांना कोणताही धोका नसल्यामुळे स्थलांतरीत पक्षी दरवर्षी येथे वास्तव्याने येत आहेत. पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या बाहेरील लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून छोटासा पार्क वन विभागाच्या वतीने तयार करण्यात येत असून निधीअभावी सदर काम अर्धवट स्थितीत थांबलेले आहे. सदर काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
या जातींच्या पक्ष्यांचे आहे वास्तव्य
वघाळा जुना येथील वैनगंगा तिरावर तसेच चिंचेच्या झाडांवर ओपन बील स्टॉर्क, ब्लॅक कारमोरंट, व्हाईट आयबीस, चेस्टनट बिटर्न, कॅटक इग्रेट, करकोचा, पेन्टेड स्टार्क अशा विविध देशी, विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन जुना वघाळा येथे झालेले आहे. वघाळा जुना येथील वैनगंगा नदीतीरावर, चिंचेच्या झाडावर गावाच्या सभोवताल मोकळ्या जागेवर स्थलांतरीत पक्ष्यांचा मुक्त संचार दिसून येत आहे.