सालमारा येथे वाढली दारू गाळणाऱ्यांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:23+5:302021-09-21T04:40:23+5:30
जोगीसाखरा गटग्रामपंचायत अंतर्गत सालमारा हाताला कोणताही रोजगार नसल्याच्या नावाखाली गावातील काही व्यक्त्ती अवैध मोहफुलाची दारू मोठ्या प्रमाणात गाळत ठोक ...

सालमारा येथे वाढली दारू गाळणाऱ्यांची संख्या
जोगीसाखरा गटग्रामपंचायत अंतर्गत सालमारा हाताला कोणताही रोजगार नसल्याच्या नावाखाली गावातील काही व्यक्त्ती अवैध मोहफुलाची दारू मोठ्या प्रमाणात गाळत ठोक व चिल्लर विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. अनेक वर्ष दारूबंदी गाव असलेल्या शांतताप्रिय गावात दारूविक्रेत्यांनी पोलिसांच्या आशीर्वादाने नव्याने डोके वर काढले आहे. कसेबसे घरखर्चासाठी मिळून ठेवलेले उपजीविकेचे पैसे कुटुंबप्रमुख दारूमध्ये घालवीत आहे. मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलमध्ये रिचार्ज करायला पैसे नाही. महिलांना मारहाण करणे, शेजाऱ्यांशी भांडण करणे या प्रकरणांमुळे शांतता व सुव्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे. दारूशौकिनांचे लोंढे गावामध्ये दाखल होत आहेत.
दिवसाढवळ्या २४ तास दारूची ने-आण व देवाणघेवाण सुरू असताना पोलीस प्रशासनाला दारू विक्रेता गुन्हेगार हाताशी लागू नये, ही बाब पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. शाळा बंद असल्यामुळे अवघ्या पाचवी व सहाव्या वर्गातील विद्यार्थीदेखील दारू गाळणाऱ्या व्यावसायिकांसाेबत जंगलात जाऊन दारू काढायला लागले. त्यामुळे गावासह कुटुंबातील वातावरण प्रचंड तापले असून महिलांमध्ये मुलांच्या भवितव्याची काळजी दिसून येत आहे. आरमोरी पोलीस प्रशासनाने सालमारा येथील ठोक व चिल्लर दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा गावातील सुजाण महिला, पुरुष व नागरिकांनी दिला आहे.