कोरचीत मलेरिया रूग्णांची संख्या १६९ वर पोहोचली
By Admin | Updated: November 20, 2015 01:46 IST2015-11-20T01:46:52+5:302015-11-20T01:46:52+5:30
कोरची तालुक्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. गुरूवारी एकाच दिवशी कोरची ग्रामीण रूग्णालयात ....

कोरचीत मलेरिया रूग्णांची संख्या १६९ वर पोहोचली
आरोग्य मंत्र्यांकडूनही दखल : १९ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले
कोरची : कोरची तालुक्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. गुरूवारी एकाच दिवशी कोरची ग्रामीण रूग्णालयात १६ तर मसेली आरोग्य पथकात ३ असे १९ रूग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आले.
कोरची तालुक्यात मलेरियाची साथ पसरली असून गेल्या नऊ दिवसात १६९ मलेरिया पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. कोरची ग्रामीण रूग्णालयाला गुरूवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, देसाईगंजचे माजी सभापती परसराम टिकले, तुलाराम सयाम, मेघशाम जमकातन यांनी भेट देऊन रूग्णांशी चर्चा केली व परिस्थितीची पाहणी केली. मसेली परिसरातील रूग्णांना मसेली आरोग्य पथकात भरती करण्यात आले आहे. या तालुक्यात प्रत्येक गावात घरी जाऊन रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्याच्या सूचना तालुका आरोग्य प्रशासनाला देण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. कमलेश भंडारी यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान कोरची तालुक्यात १०-१२ दिवसांपासून सुरू असलेल्या मलेरियाच्या साथीची राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. या रूग्णालयात डॉक्टर व पॅथालॉजी टेक्नीशिअनची कमतरता असल्याची बाब जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल व कोरची तालुका शिवसेना प्रमुख नसरू भामानी यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मंत्रालयातून आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. संजय जयस्वाल यांना आपण स्वत: व सोबत दोन डॉक्टर व दोन पॅथालॉजीस्ट घेऊन मलेरियाग्रस्त कोरची गावाला भेट द्या व या भागात रूग्णांना आरोग्य सेवा पुरवा, असे निर्देश दिले, अशी माहिती सुरेंद्रसिंह चंदेल यांनी लोकमतशी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)