एनआरएचएम कर्मचारी आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 02:12 IST2016-08-24T02:12:00+5:302016-08-24T02:12:00+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विनाशर्त शासन सेवेत सामावून घेण्यात यावे,

एनआरएचएम कर्मचारी आंदोलन करणार
बुधवारपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन : पदाधिकारी व अधिकाऱ्यांना निवेदन
गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विनाशर्त शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, समायोजनाची प्रक्रिया शासनाकडून पूर्ण होईपर्यंत समान काम, समान वेतन देण्यात यावे, या मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सर्व कंत्राटी कर्मचारी २४ आॅगस्ट बुधवारपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहेत.
यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, तसेच जि. प. चे उपाध्यक्ष जीवन नाट यांना मंगळवारी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून विविध पदांवर अत्यंत तुटपुंज्या मानधनावर गडचिरोली जिल्ह्यात ७५० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, एएनएम, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत रिक्त असलेल्या जागेवर सामावून घेण्यात यावे, यासाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. तसेच लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात आली. मात्र शासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद घेतला नाही. (प्रतिनिधी)