दिलीप दहेलकर, गडचिराेलीगडचिरोली : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गडचिराेली येथे घोषणा केल्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.०५ या वेळात भरविण्याचा सुधारित आदेश आदिवासी विकास विभाग मंत्रालयातून मंगळवार, २५ फेब्रुवारीला निर्गमित झाल्याने आता वेळापत्रकावरून राज्यात निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर झाली आहे.
यापूर्वी ३ फेब्रुवारीला निर्गमित झालेल्या आदेशात आश्रमशाळेची वेळ सकाळी ९.४५ ते ५.१० अशी केली होती. चूक दुरुस्ती झाल्याने सिटू संघटनेच्या संघर्षाला अखेर यश आले. विशेष म्हणजे आश्रमशाळेचे वेळापत्रक चुकीचे असल्याचे वृत्त प्रकाशित केले हाेते.
आदिवासी विकास आयुक्तालय अंतर्गत नाशिक, ठाणे ,अमरावती व नागपूर हे चार विभाग असून राज्यातील ३० प्रकल्पात ४९७ शासकीय तर ५५३ अनुदानित असे एकूण १ हजार ५० आश्रमशाळा आहेत. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, देवरी, भंडारा, चंद्रपूर, चिमूर, गडचिरोली, अहेेरी व भामरागड असे नऊ प्रकल्प कार्यालय असून नागपूर विभागात ७७ शासकीय तर १३१ अनुदानित असे एकूण २०८ आश्रम शाळा आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ४३ शासकीय व ४६ अनुदानित असे एकूण ८९ आश्रम शाळा आहेत.
या सर्व आश्रमशाळा आता सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.०५ या वेळात तर शनिवारला सकाळी ७.४५ ते ११.५५ पर्यंत भरणार आहेत. यापूर्वी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचे सह सचिव वि.फ.वसावे यांनी ३ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या आदेशा सोबत जोडलेल्या शालेय वेळापत्रकामध्ये आश्रमशाळा सकाळी ९.४५ वाजता भरविण्याची वेळ दिली होती. सदर चूक लक्षात आल्याने चुकीची दुरुस्ती करून सह सचिव वि.फ.वसावे यांनी आता सुधारित वेळापत्रक २५ फेब्रुवारीला निर्गमित केले आहे.
विद्यार्थी जेवनाच्या चुकीच्या वेळेने नाराजीनविन वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांना जेवणाची वेळ दुपारी १२.४५ ते १.४५ असल्याने संघटना, शिक्षक ,कर्मचारी,पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये जेवणाच्या वेळेवरून नाराजीचा सुर उमटत आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ सकाळी ९.४५ वाजता करावी, अशी मागणी सिटू संघटनेने केली आहे.
संघटनेच्या पाठपुराव्याला यशसिटू संलग्न आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून दोन सत्रातील अन्यायकारक व गैरसोयीचे वेळापत्रक बदलवून आश्रमशाळा पूर्ववत ११ ते ५ या वेळात भरविण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी दोनदा मुंबई येथील आझाद मैदानावर भर पावसात आश्रम शाळेतील हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन केले होते. शिक्षकांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर देखील काळ्या फिती लावून बहिष्कार घातला होता. वेळोवेळी शासन स्तरावर व वरिष्ठ कार्यालयात निवेदनेही दिले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही वेळापत्रक बदलविण्याची मागणी लावून धरली होती.