आता कोरेगावात होणार दारूबंदीची अंमलबजावणी
By Admin | Updated: March 1, 2015 01:39 IST2015-03-01T01:39:16+5:302015-03-01T01:39:16+5:30
तालुक्यातील कोरेगाव चोप येथे मागील काही महिन्यांपासून अवैध धद्यांना उत आलेला आहे. यामुळे युवा पिढी भरकटत असल्याचे दिसून येते.

आता कोरेगावात होणार दारूबंदीची अंमलबजावणी
देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव चोप येथे मागील काही महिन्यांपासून अवैध धद्यांना उत आलेला आहे. यामुळे युवा पिढी भरकटत असल्याचे दिसून येते. याची दखल घेत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा उचलून गावातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याचा एक मुख्य ठराव शनिवारी झालेल्या ग्रामसभेत पारित केला. त्यामुळे आता कोरेगावात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याने दारूविक्रेत्यांचे व अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
कोरेगावातील अवैध दारूविक्री व इतर अवैध धंद्याविरोधात गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र या तक्रारीची पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन अवैध धंद्यावर आळा घालण्याचा निर्णय घेतला.
अवैध धंद्याबाबत देसाईगंज पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर याची कुणकुण दारू विक्रेत्यांना लागत असल्यामुळे धाड टाकूनही पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. परिणामी गावातील भर चौकात मोठ्या प्रमाणात सट्टा, जुगार, अवैध दारूविक्री सुरू असून देखील संबंधित अवैध व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे दारू तस्करांसह मद्यविक्रेते अधिकच निर्ढावले. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या तसेच पोलिसांना माहिती देणाऱ्यांनाच धमक्याही दिल्या जाऊ लागल्या होत्या. गावातील वाढत्या अवैध धंद्यामुळे अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त झाले तसेच अनेक जण दारू सेवनाच्या आहारी गेल्याने गावातील सामाजिक वातावरण बिघडले. याचे विपरित परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतील हे ओळखून ग्रामस्थांनी अवैध दारूविक्री व अवैध धंद्याविरोधात एकत्र येण्याचा निर्धार केला.
पोलिसांच्या सहकार्याशिवाय गावातील अवैध दारूविक्री व इतर अवैध धंदे पूर्णपणे बंद करू, असा निर्णय या ग्रामसभेत घेतला. ग्रामसभेला कोरेगावच्या सरपंचा ममिता आळे, ग्रामसेवक किरसान, ग्रा.पं. सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)