आता नॉन बीपीएल कुटुंबांनाही घरकूल

By Admin | Updated: May 21, 2015 01:43 IST2015-05-21T01:43:21+5:302015-05-21T01:43:21+5:30

रमाई घरकूल योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो.

Now home to non BPL families | आता नॉन बीपीएल कुटुंबांनाही घरकूल

आता नॉन बीपीएल कुटुंबांनाही घरकूल

गडचिरोली : रमाई घरकूल योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो. दारिद्र्य रेषेखालील अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे. गडचिरोली शहरातील रमाई घरकूल योजनेसाठी पात्र असलेल्या बीपीएलधारक लाभार्थ्यांची संख्या आटोपली आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने नॉन बीपीएल अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या घरकुलांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. पालिकेकडे या योजनेचा सध्या ६० लाखांचा निधी शिल्लक आहे. जिल्हा प्रशासन नॉन बीपीएल लाभार्थ्यांसाठी घरकूल मंजूर करण्यास अनुकूल आहे. त्यामुळे आता गडचिरोली शहरातील नॉन बीपीएल अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबांना रमाई घरकुल योजनेतून हक्काचे घर मिळणार आहे.
अनुसूचित जातीच्या कुटुंबीयांचा निवासाचा प्रश्न सुटावा व त्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी शासनाने १५ नोव्हेंबर २००८ पासून रमाई घरकूल योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामीण व शहरी भागामध्ये लाभार्थ्यांच्या २६९ चौरस फुटाच्या जागेवर घर बांधून देण्यासाठी अनुदान दिल्या जाते. ग्रामीण भागात घरकूल लाभार्थ्यांना एक लाख रूपये तर शहरी भागात दीड लाख रूपयांचे अनुदान दिले जाते. राज्यात रमाई घरकूल योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ९ मार्च २०१० पासून सुरू झाली.
रमाई घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात २०१०-११ या वर्षात ५० घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी ३२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर १८ घरकुलांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती आहे. सदर घरकूल बांधकामावर नगर पालिकेने ७२ लाख ३० हजार रूपयांचा खर्च केला आहे. २०११-१२ या वर्षात ४० घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी ३१ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून नऊ घरकूल अपूर्ण स्थितीत असल्याची माहिती आहे. २०११-१२ या वर्षातील घरकूल बांधकामावर पालिकेने ५६ लाख ८५ हजार रूपयांचा खर्च केला आहे. २०१२-१३ या वर्षात गडचिरोली शहरात एकूण ११ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी आठ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून तीन घर अपूर्ण स्थितीत आहेत. यावर्षातील घरकूल बांधकामावर पालिकेने १६ लाख पाच हजार रूपयांचा खर्च केला आहे.
रमाई घरकूल योजनेंतर्गत नगर परिषदेच्या वतीने शहरी भागातील लाभार्थ्यांना घराचे बांधकाम सुरू करण्यासाठी पहिल्या हप्त्यात ७५ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. दरवाजास्तरापर्यंत बांधकाम झाल्यानंतर ६० हजार रूपयांचा दुसरा हप्ता दिला जातो. घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सबंधित लाभार्थ्यांना तिसरा हप्त्याचे १५ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. सदर अनुदानासाठी संबंधित लाभार्थ्यांनी घरकूल, शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याचे छायाचित्र तसेच आर्किटेक्टचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अनुदानाची कार्यवाही करतात.(स्थानिक प्रतिनिधी)
बीपीएलधारकांपुढे कागदपत्रांची अडचण
गडचिरोली शहरात विविध वार्डात अतिक्रमण करून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंब कच्चे घर बांधून वास्तव्य करीत आहे. या कुटुंबांकडे स्वत:च्या मालकीची जागा असल्याचे कागदपत्र नाहीत, त्यामुळे घरकुलाचा लाभ घेण्यास त्यांच्यापुढे मोठी अडचण आहे. अनुसूचित जातीचे अनेक कुटुंब बाहेर गाववरून तसेच जिल्ह्यातून गडचिरोली शहरात काही वर्षांपूर्वी आले आहेत. त्यांनी अतिक्रमणाच्या जागेवर कच्चे घर तयार केले आहे. मात्र अतिक्रमीत जागा संबंधित कुटुंबीयांच्या नावाने होत नसल्याने त्यांना जागेचे कागदपत्र मिळत नाही. घर बांधल्यानंतर नगर पालिकेच्या वतीने घरटॅक्स लागू केला जातो. अशा अतिक्रमीत कुटुंबांची संख्या शहरात मोठी आहे. मात्र शासनाच्या जाचक अटीमुळे अनेक कुटुंबांना रमाई घरकूल योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी राज्य सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.

Web Title: Now home to non BPL families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.