आता वणव्यावर उपग्रहाची नजर
By Admin | Updated: March 26, 2015 01:27 IST2015-03-26T01:27:11+5:302015-03-26T01:27:11+5:30
वणवा आपत्कालीन घोषित झाला. जंगलातील वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता आकाशातील उपग्रहाची नजर राहणार आहे.

आता वणव्यावर उपग्रहाची नजर
वैरागड : वणवा आपत्कालीन घोषित झाला. जंगलातील वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता आकाशातील उपग्रहाची नजर राहणार आहे. वणव्यावर करडी नजर ठेवण्यासाठी आकाशात उपग्रह सोडण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी सर्व वनाधिकाऱ्यांना दिली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
नैसर्गिक कारणापेक्षा मानवीकृत घटकांकडून जंगलात आग लागण्याचे प्रकार अधिक होत असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आकाशातील उपग्रहासोबत वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ आग लागलेल्या जंगल परिसरात पोहोचून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवित असल्याचे दिसून येते. उन्हाळ्यात जंगलांना आग लागून मोठी हानी होत असते. सदर आग तत्काळ आटोक्यात यावी, याकरिता वन विभागाने इतर विभागाचे वाहनेसुद्धा अधिग्रहीत केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. वणव्यामुळे वन्यप्राण्यांचे नुकसान होऊ नये, तसेच वनसंपदेचा ऱ्हास होऊ नये, याकरिता शासनस्तरावर गंभीर दखल घेतली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही वनाधिकाऱ्यांना वणव्यावर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी जागता पहारा असल्याची माहिती आहे. वणव्याच्या नियंत्रणाबाबत एवढे सक्त आदेश असतानाही जे अधिकारी व कर्मचारी आपल्या वनपरिक्षेत्रातील वणव्याबाबत बेफिकीर आहेत. त्यांच्या वनपरिक्षेत्रातील जंगल आगीच्या भक्षस्थानी सापडले असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात काही भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलांमध्ये वणवे लागले आहेत. मात्र याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. वणव्यामुळे जंगल जळून खाक झाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आगीच्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळावर पोहोचत आहेत. यंदा वणव्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या वर्षात वणव्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. वन विभागाच्या प्रत्येक क्षेत्र सहाय्यकाच्या कार्यालयात आग विझविण्यासाठी यंत्र उपलब्ध झाली असून वणव्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)