आता उमेदवारी अर्जही आॅनलाईन
By Admin | Updated: December 3, 2014 22:50 IST2014-12-03T22:50:00+5:302014-12-03T22:50:00+5:30
जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका व ३८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी २३ डिसेंबरला मतदान होणार असून, ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्ज

आता उमेदवारी अर्जही आॅनलाईन
२३ डिसेंबरला : जिल्ह्यात ४७ ग्रामपंचायतीची निवडणूक
गडचिरोली : जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका व ३८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी २३ डिसेंबरला मतदान होणार असून, ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्ज आॅनलाईन भरावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी प्रथमच आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्ह्यातील कुरूमपल्ली, मांढरा, वेंगणूर, देवदा, वाघेझरी, जव्हेली खुर्द, जव्हेली (बु.) व नागुलवाडी या ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका होणार आहेत; तर ३८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. सदर निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी आवेदनपत्रे दाखल करतात, ती आॅनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य आहे. आवेदनपत्रे आॅनलाईन पद्धतीने भरण्यासाठी संग्राम कक्ष मदत करणार असून, अर्ज भरून देण्यासाठी संग्राम कक्ष केवळ २० रूपये फी आकारणार आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचे मतदान इव्हीएम यंत्रांद्वारे घेण्यात येईल. या यंत्रावर नोटा बटनाची सुविधा असणार आहे.
४ ते ८ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते ३ पर्यंत आवेदनपत्र सादर करण्याची मुदत आहे. ९ डिसेंबरला अर्जांची छाननी, ११ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची दिनांक, त्याच दिवशी चिन्हांचे वाटप व गरज पडल्यास २३ डिसेंबरला सकाळी ७.३० ते दुपारी ३ या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २४ डिसेंबरला होणार असून, मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आयोगाने प्रशिक्षण दिले. ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया संगणकीकृत करण्याच्या दिशेने आयोगाने पावले टाकली असून, आॅनलाईन अर्ज भरणे पहिले पाऊल आहे. या प्रशिक्षणाला अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड व सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)