आता २० गटांना मिळणार दालमिल यंत्र
By Admin | Updated: April 2, 2015 01:44 IST2015-04-02T01:44:23+5:302015-04-02T01:44:23+5:30
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकरी/महिला बचतगटांना ९० टक्के अनुदानावर दालमिल यंत्र मिळण्यासाठी २०१४ च्या जुलै महिन्यात ...

आता २० गटांना मिळणार दालमिल यंत्र
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकरी/महिला बचतगटांना ९० टक्के अनुदानावर दालमिल यंत्र मिळण्यासाठी २०१४ च्या जुलै महिन्यात शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. यावर निर्णय घेत शासनाने या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. ११ तालुक्यातील २० शेतकरी/महिला बचत गटांना दालमिल यंत्र पुरविण्यासाठी १८ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे आता ११ तालुक्यातील २० गटांना दालमिल यंत्र मिळणार आहे.
शेतकरी/महिला गटाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने जि. प. च्या कृषी विभागाने नियोजन करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. उशीरा का होईना शासनाने दालमिल कृषी प्रक्रियेच्या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पास ३१ मार्च २०१५ रोजी मान्यता प्रदान केली आहे. यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास विभागाने ३१ मार्च रोजी शासन निर्णय जारी केला आहे. जिल्ह्यात तूर, लाखोळी, हरभरा, उडीद, मूग आदी कडधान्याची खरीप हंगामात पाच हजार ९७० हेक्टर व रबी हंगामात १४ हजार ६७० हेक्टर असे एकूण २० हजार ६४० हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यात पुरेशा सोयीसुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळत नाही.
जिल्ह्यात होणाऱ्या कडधान्यावर स्थानिक ठिकाणी प्रक्रिया करता यावी, यासाठी ११ जिल्ह्यातील २० शेतकरी गटांना ९० टक्के अनुदानावर दालमिल व स्पायरल सेपरेटर व धान्य कोटी संच पुरविण्यात येणार आहे. शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिल्यामुळे जिल्ह्यातील २० शेतकरी गटांची रोजगाराच्या माध्यमातून प्रगती होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)