वर्षभरापासून पशुवैद्यकीय अधिकारी नाही
By Admin | Updated: December 31, 2014 23:24 IST2014-12-31T23:24:17+5:302014-12-31T23:24:17+5:30
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे पशुवैद्यकीय दवाखाना चालविल्या जातो. या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गणवीर यांचे अपघाती निधन झाले.

वर्षभरापासून पशुवैद्यकीय अधिकारी नाही
वैरागड : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे पशुवैद्यकीय दवाखाना चालविल्या जातो. या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गणवीर यांचे अपघाती निधन झाले. तेव्हापासून या पशुवैद्यकीय दवाखान्यात नव्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून वैरागडचा पशुवैद्यकीय दवाखाना शिपायाच्या भरवशावर सुरू आहे.
वैरागड येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना असून या दवाखान्यांतर्गत पाटणवाडा, मेंढेबोडी, मोहझरी, सुकाळा, वडेगाव, मेंढा, डोंगरतमाशी, पुरंडीमाल, करपडा, लोहारा आदी १० गावे येतात. या दहा गावात जनावरांची संख्या मोठी आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारची खासगी पशुवैद्यकीय सेवा नसल्यामुळे अनेक जनावर मालक आपली आजारी जनावरे वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणतात. मात्र या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने येथे कार्यरत शिपाईच आजारी जनावरांवर थातूरमातूर उपचार करतो. परिणामी योग्य व पुरेशा औषधोपचाराअभावी या परिसरात अनेक आजारी जनावरे दगावल्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे वैरागड परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. प्रशासनाने तत्काळ वैरागड येथे नव्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी जनावर मालकांनी केली आहे. (वार्ताहर)