अर्थ प्राप्तीसाठी नाही, तर अर्थपूर्ण जगा
By Admin | Updated: January 23, 2015 02:20 IST2015-01-23T02:20:20+5:302015-01-23T02:20:20+5:30
गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पश्चिम दिशेकडील मुंबईकडे न बघता, पूर्वेकडील गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील आदिवासींच्या अंधारमय जीवनाकडे बघावे ...

अर्थ प्राप्तीसाठी नाही, तर अर्थपूर्ण जगा
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पश्चिम दिशेकडील मुंबईकडे न बघता, पूर्वेकडील गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील आदिवासींच्या अंधारमय जीवनाकडे बघावे गुणवंतांनी अर्थप्राप्तीसाठी न जगता मागासलेल्या समाजाच्या कल्याणासाठी अर्थपूर्ण जगावे, असा मौलिक संदेश ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी दिला.
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या द्वितीय दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित होते. प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, विद्यापीठाच्या मराठी भाषा विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाभाऊ मुनघाटे, शिक्षणशास्त्र विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक जिवतोडे, विधी विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली हस्तक, अभियांत्रिकी विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनिष उत्तरवार गृहविज्ञान विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. माधुरी नासरे, समाज विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता अमित धमानी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. जे. व्ही. दडवे, ग्रंथपाल रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. बंग म्हणाले, पूर्वी विशिष्ठ समाजातील विद्यार्थी सुवर्ण पदक मिळवित होते. मात्र आता सर्व समाजातले घटक शिक्षणात सुवर्ण पदक मिळवित आहेत. उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत आता मुली पुढे आल्या आहेत. यावरून समाज सुधारक महात्मा फुले व महर्षी कर्वे यांच्या स्वप्नातील शैक्षणिक क्रांती गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात घडत आहे, हे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.
या समारंभात मुस्लिम समाजाच्या एका गुणवंत मुलीने सुवर्ण पदक स्वीकारतांना माझ्याशी हस्तांदोलन केले तसेच वाकून नमस्कारही केला. यावरून आपल्या देशाला आता तालिबानचा धोका नाही, हे दिसून येते. लहूजी मडावी, गो. ना. मुनघाटे, शांताराम पोटदुखे यासारख्या शिक्षण प्रेमींनी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे विणून शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले. गोंडवाना विद्यापीठामार्फत दोन्ही जिल्ह्यात गावागावात शैक्षणिक क्रांती पोहोचत आहे, असेही डॉ. बंग यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विद्यापीठात प्रवेश करणे आवश्यक आहे. स्वधर्म पाळून, स्वधर्माच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावे. गुणवंतांनी असुविधेच्या ठिकाणी जाऊन पथदर्शी व्हावे. सुवर्ण पदक डीग्रीची मागची कोरी बाजू समाज परिवर्तनाने लिहून काढावी, असे आवाहनही डॉ. बंग यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरेकर व प्रा. अस्लम शेख यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी मानले.
कार्यक्रमाला गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, विद्यापीठ संलंग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व गोंडवाना विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुवर्ण पदक प्राप्त प्रज्ञावंत
संतोष श्याम हेडाऊ, स्नेहा वसंत येंलगवार, कश्यप ललीतकुमारी सुरेश, देबनाथ पुनम सुशील, अल्का हरिदास लांडगे, माधुरी चंद्रकांत बोरीकर, रिमा मुलचंद देहलानी, मोनिका घनश्यामदास सावलानी, भाविका कांतिलाल बलदानिया, अनिल केला, अस्मिता रायपुरे, शुभांगी नक्षीणे, शिवशंकर गोपीचंद रामटेके, भूमी जितेंद्र पटेल, विक्की राठोड, गोविंदा मदन झाडे, नम्रता महादेव कावळे, शब्बीर हुसेन, शागुप्ता अंजुम अब्दुल हलीम, गणेश लक्ष्मण कुळमेथे, श्वेता रामभाऊ रत्नपारखी, एकता निवृत्ती गायकवाड, मिनल सुभाष घिवे, उमेश कवडू वरघणे, महेश कालिदास मेश्राम, भाग्यश्री रामदास मदनकर, स्वाती अशोक टेकडे, मोनाली तुळशीराम नागपुरे, सरिता रामचंद्र मंडरे, शुभांगी दिनकर तिघरे, साईनाथ कवडू सोनटक्के, मार्शलीन जगदीश खोब्रागडे, अरविंद तुळशिराम सिडाम, सदानंद पुरूषोत्तम धुळसे, नरेंद्र अंबादास मेश्राम या सुवर्ण पदक प्राप्त प्रज्ञावंतांना मान्यवरांच्याहस्ते पदवी दान करण्यात आले.
गुणवंतांनी समाजातील आव्हानांना सामोरे जाऊन आपल्या ज्ञानातून गोरगरिब, मागास लोकांची सेवा करावी, गुणवंतांनी विक्रीसाठी उभे राहू नये, जीवनाचा अर्थ समाजात शोधावा लागतो. ज्या ठिकाणी सोयी- सुविधा आहेत. त्या ठिकाणी गुणवंतांची गरज नाही. ज्या ठिकाणी सोयी- सुविधांचा अभाव आहे, अनेक ज्वलंत समस्या आहेत, त्या ठिकाणी गुणवंतांची खऱ्या अर्थाने गरज आहे.
- डॉ. अभय बंग
विद्यापीठाच्या विकास आराखड्यांत भौगोलिक परिस्थितीचा विचार करून सर्वांगिण विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मागास भागातील तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करून शैक्षणिक विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. विद्यापीठाकडे विविध उपक्रमांना लागणारा फंड शासनाकडून मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. २३६ महाविद्यालये या विद्यापीठांतर्गत असून परीक्षा पद्धतीत व्यापक बदल करण्यात आले आहे. याशिवाय विविध विषयांवर कार्यशाळा आयोजनही करण्यात आले.
- डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, कुलगुरू