नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:54+5:302021-07-21T04:24:54+5:30
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेस ही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. ...

नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेस ही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
शासकीय दूध शीतकरण केंद्राचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तालुक्यातील घाटी, गांगुली, मालदुगी परिसरातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्ता देखील नाही.
मुलचेरात पाळीव डुकरांचा हैदोस वाढला
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाण ही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने स्वच्छतेबाबत माेहीम हाती घेतली नाही.
कव्हरेजअभावी माेबाईलधारक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. टाॅवर व भूमिगत केबल लाईनवर लाखाे रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नाही.
शेतकरी विविध योजनांपासून अनभिज्ञ
देसाईगंज : कृषी, महसूल व वनविभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने, या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही. परिणामी, योजनांपासून अनेक शेतकरी वंचित आहेत.
अगरबत्ती बनविण्याच्या मजुरी दरात वाढ करा
गडचिरोली : वनविभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पांमध्ये शेकडो मजूर काम करीत आहेत. मात्र, अगरबत्ती बनविण्याचा दर अत्यंत कमी असल्याने मजुरांना कमी मजुरी मिळत आहे. मजुरी वाढविण्याची मागणी मजुरांकडून होत आहे.
अल्पवयीनांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाई होत नसल्याने अल्पवयीन वाहनचालकाचे प्रमाण वाढले आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एसटीला फटका
अहेरी : जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी या दोन आगारांमार्फत राज्य परिवहन महामंडळाची बससेवा संपूर्ण जिल्ह्यात चालविली जाते. गडचिरोली आगाराच्या १०५ व अहेरी आगाराच्या ६५ बसगाड्या दुर्गम भागात धावतात. मार्गावरील खड्ड्यांमुळे एसटीचे नुकसान होत आहे.
पं. स. परिसरातील प्रसाधनगृहाची दुरवस्था
आरमाेरी : स्थानिक पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या प्रसाधनगृहात घाण साचली आहे. भिंतीलाही विद्रुप स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, स्वच्छतेकडे पं. स. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीत ग्रामीण भागातील अनेक नागरिक कामानिमित्त येतात. प्रसाधनगृह स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
वन जमिनीवर अतिक्रमण ; जंगल धोक्यात
आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वनविभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल, त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे.
जननी शिशु सुरक्षा योजनेची जागृती करा
गडचिरोली : शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या जननी शिशु सुरक्षा योजनेचा अनेक ठिकाणी फज्जा उडाला आहे. अनेक महिला शासनाच्या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. आरोग्य विभागामार्फत या योजनेची प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने योजना मर्यादित आहे.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
काेरची : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयामार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने ही योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवर ही कामाचा भार वाढला आहे.
प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
रांगी : परिसरात प्रत्येक गावी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या प्रवासी निवाऱ्याकडे एसटी विभाग व शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही निवारे मोडकळीस आले आहेत. काही निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर थांबून बसची वाट बघत असल्याचे चित्र बघावयास मिळते.
जिल्ह्यात माडिया भाषेत शिक्षणाची सोय करा
गडचिरोली : दुर्गम भागात माडिया भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षक व शाळा हा प्रवाह काही दिवसांपूर्वी पुढे आला होता. मात्र त्या शाळा सुरू झाल्या नाहीत. हिंदी व बंगालीप्रमाणे माडिया भाषेतून शिक्षणाची सोय करण्याची मागणी आहे.
पांदण रस्त्यांवर अतिक्रमण वाढले
गडचिरोली : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. या पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.
वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार
गडचिरोली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून, लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
बालमजुरी कायद्याची अवहेलना सुरूच
कुरखेडा : जिल्ह्याच्या शहरी भागात हॉटेल, गॅरेज, चहा टपऱ्या व इतर दुकानांमध्ये अल्पवयीन मुले काम करीत आहेत. परिणामी बालमजुरी कायद्याची खुलेआम अवहेलना होत आहे. १६ वर्षांखालील बालकांना तुटपुंजी मजुरी देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे.