उपक्रमशीलता जपणारी न. प. शाळा
By Admin | Updated: September 5, 2015 01:25 IST2015-09-05T01:25:00+5:302015-09-05T01:25:00+5:30
विद्यार्थ्यांना ई- लर्निंग सोबतच शालेय, सहशालेय उपक्रम औषधी वनस्पतींची लागवड, कंपोस्ट खत निर्मिती, ....

उपक्रमशीलता जपणारी न. प. शाळा
ई-लर्निंगचे धडे : आयएसओ दर्जा प्राप्त करून वाढविला जिल्ह्याचा गौरव
गडचिरोली : विद्यार्थ्यांना ई- लर्निंग सोबतच शालेय, सहशालेय उपक्रम औषधी वनस्पतींची लागवड, कंपोस्ट खत निर्मिती, काटकसर यासह विविध संस्कारक्षम बाबींचे धडे देऊन उपक्रमशीतला जपत गडचिरोली येथील रामनगरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद प्राथमिक शाळेने राज्यातील आएसओ दर्जा प्राप्त करून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. प्राथमिक शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व उपक्रमशीलता जागृत करण्याच्या उद्देशाने मुख्याध्यापक सुधीर गोहणे विविध उपक्रम राबवित आहेत. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी जवाहरलाल नेहरू न. प. शाळेला आएसओ नामांकन जाहीर करण्यात आले.
शाळेच्या आवाराची झाडूने स्वच्छता केल्यानंतर जमा होणारा कचरा विशिष्ट जागी टाकून त्यापासून कंपोस्ट खत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तयार केले जाते. या खताच्या भरवशावर शाळेची परसबाग विद्यार्थी व शिक्षकांनी फुलविली आहे.
बालमनाला वनौषधीचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेने पुढाकार घेतला आहे. शाळेच्या आवारात पानफुटी, गवती चहा, निलगिरी, शतावरी, पुदीना, अडुळसा, कोरफड आदी वनौषधीची लागवड करून त्याचे त्यांचे संगोपन करण्यात आले आहे.
यांत्रिकीकरणाच्या युगात ज्या वस्तू आता कालबाह्य होत आहे. त्या वस्तू जमा करून त्याचा उपक्रम कट्टा शालेय विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. या कट्ट्याच्या माध्यमातून जुन्या वस्तूंची प्राचीन इतिहासाची सर्व माहिती विद्यार्थी स्वत: संकलित करतात व प्रचारही करतात.
विद्यार्थ्यांना बचतीचे व जीवनात आर्थिक काटकसरीचे महत्त्व लहान वयापासून कळावे, शाळेचा प्रत्येक विद्यार्थी बँकींग प्रणाली, अर्थविषयक ज्ञान यात पारंगत व्हावा, या हेतूने शाळेने विद्यार्थ्यांची बँक शाळेतच निर्माण केली आहे.
विद्यार्थ्यांसाठी निर्माण केल्या सुविधा
जवाहरलाल नेहरू शाळेने ई-शिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. अडीचशेच्या आसपास विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत वर्ग १ ते ७ पर्यंत शिक्षणाची सोय आहे. शिवाय शाळेने ई-शिक्षणासाठी विशेष कक्ष तयार केला आहे. या कक्षात १० संगणक, १ एलसीडी टीव्ही लावण्यात आले आहे. हे सर्व संगणक लॅन या यंत्रणेने जोडण्यात आले आहे. शैक्षणिक वेळेत येथे विद्यार्थ्यांना शाळेचे सर्व शिक्षक आॅनलाईन अभ्यासक्रम शिकवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे ज्ञान दिले जात आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना एक्सल, वर्ड, फोटोशॉप चांगल्या पद्धतीने हाताळता येतात.