ई-एज्युकेशनची सुविधा असलेली न. प. शाळा सन्मानित
By Admin | Updated: February 7, 2015 23:23 IST2015-02-07T23:23:56+5:302015-02-07T23:23:56+5:30
एकीकडे जिल्हा परिषद, नगर परिषद मराठी शाळांचा दर्जा ढासळत असताना गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात गडचिरोली न. प. च्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेने ई-एज्युकेशन

ई-एज्युकेशनची सुविधा असलेली न. प. शाळा सन्मानित
गडचिरोली : एकीकडे जिल्हा परिषद, नगर परिषद मराठी शाळांचा दर्जा ढासळत असताना गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात गडचिरोली न. प. च्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेने ई-एज्युकेशन सारखे अनेक उपक्रम राबवून आयएसओ प्रमाणपत्र मिळवून राज्याच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे. शाळेच्या या यशाची माहिती मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्याध्यापक गोहणे म्हणाले की, गडचिरोली नगर पालिकेच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेने मागील पाच-सात वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी विविध उपक्रम सुरू केलेत. ज्या शाळांना आयएसओ नामांकन मिळाले आहे, त्या शाळांची पाहणी करून त्या शाळांमध्ये आपल्या शाळेपेक्षा वेगळे काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यानंतर आपल्याकडे कमी असलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
आयएसओ नामांकनासाठी एक्सलंस मॅनेजमेंट सिस्टिमचे नितीन वैद्य यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात आले. आर्थिकबाबीसाठी नगर परिषदेने निधीची तरतूद करून सहकार्य केले. आयएसओ नामांकनासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर ३१ मे २०१४ रोजी आयएसओ नामांकनासाठी नोंदणी करण्यात आली. नोंदणीनंतर इंटर नॅशनल कॉन्सील एक्रेडेशन बॉडीच्या सदस्यांनी भेट दिली.
गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातही विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा व विद्यार्थ्यांचे ज्ञान बघून आश्चर्यचकीत झाले. समितीच्या सदस्यांनी अहवाल सादर केल्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी नामांकन जाहीर करण्यात आले आहे. आयएसओ नामांकनामुळे आपल्या शाळेची प्रतिष्ठा वाढली. त्यापेक्षाही इतर शाळांना यामधून निश्चितच प्रेरणा घेता येईल. आज नगर परिषदेच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र शाळांनी दर्जा सांभाळल्यास खासगी शाळांप्रमाणेच याही शाळांमध्ये पालकवर्गाची प्रवेशासाठी रांग लागेल, असा विश्वास मुख्याध्यापक गोहणे यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषदेला नगर परिषदेचे शिक्षण सभापती सचिन बोबाटे, शाळेचे शिक्षक, शाळेचे मंत्रिमंडळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.