आॅटो उलटून नऊ प्रवासी जखमी
By Admin | Updated: December 11, 2015 01:52 IST2015-12-11T01:52:53+5:302015-12-11T01:52:53+5:30
तालुक्यातील आमगाव महाल जवळ आॅटो उलटून झालेल्या अपघातात नऊ प्रवाशी जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

आॅटो उलटून नऊ प्रवासी जखमी
दोन गंभीर : चामोर्शीत उपचार सुरू
आमगाव (म.) : तालुक्यातील आमगाव महाल जवळ आॅटो उलटून झालेल्या अपघातात नऊ प्रवाशी जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. सदर घटना गुरूवारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात तर किरकोळ जखमी असलेल्या सात जणांना चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
गंभीर जखमी असलेल्यांमध्ये दिलीप सोमनकर रा. राजगट्टा, मनिषा बंडू बुरांडे (२६) रा. मुरखळा यांचा समावेश आहे. किरकोळ जखमीमध्ये कुणाल बंडू बुरांडे (८), नैतिक बंडू बुरांडे (६) दोघेही रा. मुरखळा, मायाबाई पिपरे (४५), देवाजी मट्टामी (६०), रामबत्ती सबरू साबळे (७०) तिघेही राहणार अनंतपूर, इंदिराबाई नरोटे (४०) रा. सदाटोला, रामकृष्ण भुरसे (३०) रा. हळदी यांचा समावेश आहे.
चामोर्शी येथे गुरूवारी आठवडी बाजार करण्यासाठी रेखेगाववरून एमएच ३३-९१७ क्रमांकाचा आॅटो प्रवाशी घेऊन चामोर्शीकडे येत होता. दरम्यान आॅटो चालक दिलीप सोमनकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटले. यामध्ये आॅटोमधील नऊ प्रवाशी जखमी झाले. या जखमींमध्ये वाहनचालक दिलीप सोमनकर याचाही समावेश आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच भाऊराव देवतळे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, पोलीस पाटील साईनाथ गावतुरे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना तत्काळ ग्रामीण रूग्णालय चामोर्शी येथे भरती केले. त्याचबरोबर अपघाताची माहिती पोलिसांना दिली. घटनेचा तपास एएसआय गोवर्धन करीत आहेत. वाहनचालक दारू पिऊन असल्याची माहिती उपस्थितांनी दिली. (वार्ताहर)