अवजारांसाठी नऊ कोटींचा निधी
By Admin | Updated: August 17, 2016 01:39 IST2016-08-17T01:39:01+5:302016-08-17T01:39:01+5:30
शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने ८ कोटी ९८ लाख रूपयांची तरतूद केली

अवजारांसाठी नऊ कोटींचा निधी
कृषीपयोगी साहित्य : शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू
गडचिरोली : शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने ८ कोटी ९८ लाख रूपयांची तरतूद केली असून यासाठी अर्ज मागविण्याचे काम सुरू झाले आहे.
शेती कसण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य महाग असल्याने प्रत्येकच शेतकरी सदर साहित्य खरेदी करू शकत नाही. शेतीमध्ये अवजारांचा वापर न झाल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता राहत असल्याने जिल्हा परिषदेच्या मार्फतीने शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे वितरित केली जातात. आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेने ८ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता लाभार्थी निवडीचे काम सुरू झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्वाधिक निधीची तरतूद केली आहे. शासकीय दप्तरी असलेल्या नोंदीनुसार गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या ४ लाख १५ हजार ३०६ एवढी आहे. या आदिवासी शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी करताना मदत व्हावी, यासाठी ५ कोटी ७५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यासाठी ३७ लाख, आरमोरी ३० लाख ३२ हजार, देसाईगंज ९ लाख ४४ हजार, कुरखेडा ६१ लाख ४१ हजार, कोरची तालुक्यासाठी ४१ लाख ९ हजार, धानोरा ७७ लाख ४ हजार, चामोर्शी ४२ लाख ७८ हजार, एटापल्ली १ कोटी ११ लाख ७६ हजार, भामरागड ४९ लाख ४४ हजार, सिरोंचा २२ लाख ६७ हजार, मुलचेरा १८ लाख ७७ हजार, अहेरी ७३ लाख ६९ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांसाठी ६६ लाख रूपये मंजूर आहेत. (नगर प्रतिनिधी)