प्रवाशांनी जंगलात काढली रात्र!

By Admin | Updated: August 30, 2015 01:07 IST2015-08-30T01:07:32+5:302015-08-30T01:07:32+5:30

आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुडकेली नाल्यावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-लाहेरी बसमधील प्रवाशांना शुक्रवारची रात्र जंगलातच काढावी लागली.

Night in the forest! | प्रवाशांनी जंगलात काढली रात्र!

प्रवाशांनी जंगलात काढली रात्र!

नातेवाईक चिंतेत : कुडकेली नाल्यावरील पाण्यामुळे लाहेरी बस रात्रभर अडकली
भामरागड : आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुडकेली नाल्यावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-लाहेरी बसमधील प्रवाशांना शुक्रवारची रात्र जंगलातच काढावी लागली. सदर बस शनिवारी सकाळी ६ वाजता भामरागड येथे पोहोचली. रात्रभर बस न आल्याने प्रवाशांचे नातेवाईक चिंतातुर झाले होते.
शेकडो कर्मचारी, नागरिक भामरागडला जात असल्याने गडचिरोली आगाराने गडचिरोली-लाहेरी ही स्वतंत्र बस सुरू केली आहे. सदर बस लाहेरी येथे मुक्कामी राहते. सदर बस गडचिरोलीवरून दुपारी अडीच वाजता सोडण्यात येते. आलापल्लीला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पोहोचते. त्यानंतर भामरागडसाठी पुढचा प्रवास सुरू होतो. ही बस लाहेरी येथे रात्री ९ वाजताच्या सुमारास पोहोचते. त्यामुळे या बसने अनेक प्रवासी प्रवास करतात. या बसवर नेहमीच गर्दी राहते.
नेहमीप्रमाणेच गडचिरोली आगारातून एमएच-४०८९७९ ही बस २.३० वाजताच्या सुमारास प्रवासी घेऊन निघाली. सायंकाळच्या सुमारास अहेरी, भामरागड तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या कुडकेली नाल्यावरील पुलावरून पाणी वाहने सुरू झाले. रात्रीची वेळ होती. त्यामुळे पुलावरून बस टाकल्यास दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाल्यावरील पूर उतरेपर्यंत वाट बघण्याचा निर्णय बसचालक बन्सोड, बस वाहक व्ही. मडावी व बसमधील प्रवाशांनी घेतला. लहान नाले असल्याने अगदी तासात पूर ओसरतो, हा या परिसरातील प्रवाशांना आजपर्यंत आलेला अनुभव आहे. मात्र रात्रभर पाऊस पडत असल्याने पूर ओसरला नाही. परिणामी प्रवाशांना पूर ओसरण्याची वाट बघत संपूर्ण रात्र जंगलातच काढावी लागली. पहाटेच्या सुमारास पूर ओसरल्यानंतर सदर बस भामरागड येथे सकाळी ६ वाजता पोहोचली. या बसमध्ये येत असलेल्या तेजस्विनी या मुलीची वाट बघत तिचे आई-वडील रात्रभर भामरागड येथील चौकात थांबले होते. आलापल्लीवरून निघालेली बस रात्रभर न पोहोचल्याने आई-वडील चिंतेत सापडले होते. जंगलात फोनही लागत नसल्याने चिंता आणखीच वाढली होती.
या मार्गावर अनेक नाले आहेत. त्यावरील पूल उंचीने अत्यंत ठेंगणे असल्याने असे प्रकार घडत आहेत. याचा प्रचंड त्रास भामरागड तालुक्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Night in the forest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.