भामरागड पोलिसांच्या बिनागुंडा ग्रामभेटीने जागविली नवी उमेद
By Admin | Updated: January 31, 2015 23:19 IST2015-01-31T23:19:25+5:302015-01-31T23:19:25+5:30
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या छत्तीसगड सीमेलगतच्या बिनागुंडा भागात भामरागड पोलिसांनी ग्रामभेट कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी ६८ व्या गणतंत्र दिनाला

भामरागड पोलिसांच्या बिनागुंडा ग्रामभेटीने जागविली नवी उमेद
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या छत्तीसगड सीमेलगतच्या बिनागुंडा भागात भामरागड पोलिसांनी ग्रामभेट कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी ६८ व्या गणतंत्र दिनाला दिमाखाने तिरंगा ध्वज विनोबा भावे खासगी आश्रमशाळेच्या प्रांगणात फडकविला. पोलिसांच्या या ग्रामभेटीने बिनागुंडा परिसरातील आठ गावांच्या नागरिकांमध्ये नवी उमेद निर्माण करण्याचे काम या निमित्ताने झाले.
भामरागड तालुक्याच्या बिनागुंडा गावाला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दर्शन तशी दुर्मिळ बाब ठरते. या भागात अद्यापही मुलभूत सोयीसुविधांचा प्रचंड अभाव आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या योजनेतून येथे बोअरवेल व्यतिरिक्त विकासाचे कोणतेही काम दिसून येत नाही. नक्षलवाद्यांचा गड अशीच ओळख या भागाची आहे. या भागात भामरागड पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वात ग्रामभेट कार्यक्रम राबविला. बिनागुंडा भागात जाण्यासाठी रस्ता नाही, अशी स्थिती असतानाही मागील आठवड्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियानातून समाधान शिबिराचे आयोजन महसूल विभागातर्फे येथे करण्यात आले होते. पोलीस विभागानेही जनजागरण मेळावा या भागात आयोजित केला. महसूल विभागाने सातबारा, जात प्रमाणपत्र, अतिक्रमणधारकांना पट्टे तसेच श्रावणबाळ योजनेची माहिती लोकांना दिली. बिनागुंडाच्या लोकांशी थेट संवाद साधण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चमू २४ जानेवारीला लाहेरीवरून निघाली. दिवसभर पायी चालत जाऊन फोदेवाडा, कुव्वाकोडी, पेरामिल भट्टी, धामनमर्क येथे ही चमू पोहोचली. २५ जानेवारीला ग्रामस्थांच्या समस्या जाणल्यानंतर २६ जानेवारीला गणराज्यदिनी बिनागुंडात पोलीस चमू दाखल झाली. विनोबा भावे आश्रमशाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमात पोलीस सहभागी झाले. विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणल्या. नक्षलवाद्यांनी याचवेळी पोलीस दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यालाही पोलीस चमुने प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या या साहसी ग्रामभेटीची सध्या चर्चा परिसरात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)