पीएसआयची नवीन फौज जिल्ह्यात दाखल
By Admin | Updated: March 31, 2015 01:19 IST2015-03-31T01:19:37+5:302015-03-31T01:19:37+5:30
एक महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १०१ पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या होत्या.

पीएसआयची नवीन फौज जिल्ह्यात दाखल
गडचिरोली : एक महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १०१ पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या ऐवजी १०२ नवीन पोलीस उपनिरीक्षक जिल्ह्यात रूजू झाले आहेत.
गडचिरोली जिल्हा नक्षलमुळे संपूर्ण राज्यात अतिसंवेदनशील समजल्या जाते. नक्षल्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाने जवळपास पाच हजार पोलीस व ५०० हून अधिक या जिल्ह्यात काम करताना जीव मुठीत ठेवावे लागत असल्याने बहुतांश पोलीस उपनिरीक्षक रूजूच होत नाही. काही पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली जिल्ह्यात बदली होताच बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करतात. यावर्षी मात्र पहिल्यांदाच बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांपेक्षा जास्त पोलीस उपनिरीक्षक अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत रूजू झाले आहेत. एक महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून सुमारे १०१ पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व पोलीस उपनिरीक्षकांना जिल्हा पोलीस मुख्यालयात सामुहिक कार्यक्रम घेऊन निरोप देण्यात आला होता. त्यानंतर शासनाने अवघ्या आठ दिवसांत गडचिरोली परिक्षेत्रात १२१ पोलीस उपनिरीक्षकांना नेमणूका दिल्या. यातील १९ पोलीस उपनिरीक्षक गोंदिया जिल्ह्यात पाठविण्यात आले आहेत. तर उर्वरित १०२ पोलीस उपनिरीक्षकांना गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील पोलीस ठाण्यांमध्ये नेमणूका देण्यात आल्या आहेत. सर्वच पोलीस उपनिरीक्षक रूजू झाल्याने नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र होणार आहे. दाखल झालेले सर्वच पोलीस उपनिरीक्षक तरूण रक्ताचे असल्याने त्यांच्या शक्ती व युक्तीचा उपयोग नक्षलविरोधी अभियानादरम्यान होण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)