स्पर्धेत टिकण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 00:57 IST2017-01-10T00:57:00+5:302017-01-10T00:57:00+5:30
स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

स्पर्धेत टिकण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची गरज
अण्णासाहेब जाधव यांचे प्रतिपादन : कमलापूर येथे परीक्षा केंद्राचा शुभारंभ
कमलापूर : स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. मार्गदर्शन मिळाल्यास येथील विद्यार्थी स्पर्धेत मागे पडणार नाही, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले.
उपपोलीस स्टेशन रेपनपल्लीतर्फे कमलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन ९ जानेवारी रोजी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच रजनीता मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिमलगट्टाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेर, बाबा आमटे फाऊंडेशन कमलापूरचे तुरकर, डॉ. सोमेश्वर सेलोकर, श्रीधर दुग्गीरालापाटी, सचिन ओलीटीवार, पोचन्ना चौधरी, कोरके पाटील, अनंत कोहाडे, चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अण्णासाहेब जाधव म्हणाले, १९५८ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कमलापूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू केली. येथील व जिल्ह्यातील विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेऊन चांगल्या पदावर कार्यरत आहेत. ही अत्यंत चांगली बाब आहे. देश डिजिटलाझेशनकडे वळत चालला आहे. येणाऱ्या काळात शहरातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षांमध्ये टिकून नोकरी मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. सदर मार्गदर्शन केंद्र येथील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल, असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक दुरफडे, संचालन व आभारढोबळे यांनी मानले. (वार्ताहर)