क्रीडांगणांच्या विकासाची गरज
By Admin | Updated: September 6, 2016 00:58 IST2016-09-06T00:58:06+5:302016-09-06T00:58:06+5:30
गाव पातळीवर क्रीडांगण नसल्याने ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना खेळापासून वंचित राहावे लागते.

क्रीडांगणांच्या विकासाची गरज
आमदारांचे प्रतिपादन : गौरीपुरात फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन
चामोर्शी : गाव पातळीवर क्रीडांगण नसल्याने ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना खेळापासून वंचित राहावे लागते. परिणामी युवकांमध्ये क्रीडागुण असूनही त्यांच्या गुणाला वाव मिळत नाही. त्यामुळे गाव पातळीवरील क्रीडांगणाचा विकास होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
गौरीपूर येथे जय दुर्गा माँ कल्चरल अँड स्पोटर््स असोसिएशनच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौरीपूर गट ग्राम पंचायतीचे सरपंच सुनील रॉय होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, चामोर्शी नगरसेवक प्रशांत येगलोपवार, नगरसेविका मंजुषा रॉय, विष्णूपूरचे ग्रा. पं. सदस्य महानंद हलदर, माजी सरपंच बिधान रॉय उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. डॉ. देवराव होळी म्हणाले, ग्रामीण भागातील युवा अनेक खेळांमध्ये निपुण असतात. मात्र त्यांना योग्य सोयीसुविधा, क्रीडांगण, मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्याने खेळाडू मागे पडतात. गाव पातळीवर सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध झाल्यास अनेक युवा खेळाकडे वळू शकतील. अनेकांना आपले क्रीडागुण विकसित करण्यास वाव मिळेल. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन करीत खेळाडूंनी खेळाडूवृत्तीने खेळ करून स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
दरवर्षी गौरीपूर येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाही फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील बहुसंख्य चमूंनी भाग घेतला आहे. यशस्वीतेसाठी जय दुर्गा कल्चरल अँड स्पोटर््स असोसिएशनचे अध्यक्ष असिम मुखर्जी, उपाध्यक्ष तरूण गाईन, सचिव महाज्योती सिकंदर, अशोक बिश्वास, संचालक सुनील रॉय, देवाशिष मंडल, सुजीत रॉय यांनी सहकार्य केले.