नक्षलवाद्यांनी शेतकऱ्याची केली गोळी झाडून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 17:56 IST2021-09-20T17:54:48+5:302021-09-20T17:56:57+5:30
Gadchiroli News हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुरजागड गावातील सोमाजी चैतू सडमेक (५५) या शेतक?्याची नक्षल्यांनी गोळी झाडून शनिवारी रात्री हत्या केली.

नक्षलवाद्यांनी शेतकऱ्याची केली गोळी झाडून हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुरजागड गावातील सोमाजी चैतू सडमेक (५५) या शेतक?्याची नक्षल्यांनी गोळी झाडून शनिवारी रात्री हत्या केली. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून, त्यात जल, जंगल, जमिनीवर लोकांचा हक्क असल्याचे सांगत सुरजागड लोहखाणीला असलेला विरोध अप्रत्यक्षपणे प्रकट करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन नक्षल्यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास सोमाजी यांच्या घरी जाऊन त्यांना झोपेतून उठविले. यावेळी ते आणि त्यांची पत्नी असे दोघेच घरी होते. सोमाजीला सोबत नेताना बाहेरून दाराची साखळी लावून त्यांच्या पत्नीला घरात बंद केले. सोमाजीचे हात बांधून गावाबाहेर नेल्यानंतर त्यांची गोळी घालून हत्या केली आणि मृतदेह एटापल्ली ते गट्टा या मुख्य मार्गावर टाकून दिला. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सोडली. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हाकलून लावा असेही म्हटले. ही छोटेखानी चिठ्ठी मराठीत आहे हे विशेष.
जून महिन्यात नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रकात अनेकांच्या नावाचा उल्लेख होता. त्यात सोमाजीचेही नाव होते. त्यानंतर पोलिसांनी सोमाजीला सूचनापत्र देऊन सावध केले होते.
मृत सोमाजी हे सुरजागड येथील रहिवासी असले तरी खाणीच्या कामावर जात नव्हते. पोलिसांनी ही हत्या सुरजागडसंबंधी असण्याची शक्यता नाकारली आहे. सोमाजी यांना एक अविवाहित मुलगी असून घटनेच्या वेळी ती बाहेरगावी होती.