२० वर्षांपासून नक्षलपीडितांची ससेहोलपट
By Admin | Updated: July 6, 2015 01:48 IST2015-07-06T01:48:47+5:302015-07-06T01:48:47+5:30
नक्षलवाद्यांनी सरकारचे खबरे म्हणून आमच्या वडीलांची निर्घृण हत्या केली. सन १९९५ पासून नक्षलपीडित पाल्य म्हणून आमची पोलीस विभागाच्या दप्तरी नोंद आहे.

२० वर्षांपासून नक्षलपीडितांची ससेहोलपट
पोलीस विभागाकडून दखल नाही : शिफारस होऊनही स्थानिक स्तरावरून नोकरी देण्याची कार्यवाही शुन्य
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी सरकारचे खबरे म्हणून आमच्या वडीलांची निर्घृण हत्या केली. सन १९९५ पासून नक्षलपीडित पाल्य म्हणून आमची पोलीस विभागाच्या दप्तरी नोंद आहे. पोलीस विभागाकडून आम्हाला आष्टी येथे निवासासाठी भूखंड व घरकूल देण्यात आले. मात्र शासकीय नोकरीत सामावून घेतले नाही. तसेच गावाकडील शेतजमीन शासन जमा करून आष्टी परिसरात शेतजमीन देण्यात आली नाही. या दोन्ही मागण्याला घेऊन गेल्या २० वर्षांपासून आपण शासन दरबारी तसेच पोलीस विभागाच्या कार्यालयात पाठपुरावा सुरू आहे. मात्र आम्हाला न्याय मिळाला नसून पोलीस विभागाकडून आमची ससेहोलपट सुरू आहे, असा आरोप अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील नक्षलपीडित कुटुंबातील सदस्य व्यंकटी अंकलू बुर्ले व पुष्पा लिंगाजी गंदम यांनी रविवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
आम्हा नक्षलपीडित समस्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीला घेऊन आपण तत्कालीन पोलीस महासंचालकाकडे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी तत्कालीन पोलीस महासंचालकांनी या संदर्भातील कार्यवाही स्थानिक स्तरावरून करण्याचे निर्देश दिले, मात्र कार्यवाही झाली नाही, अशी माहिती व्यंकटी बुर्ले व पुष्पा गंदम यांनी यावेळी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
राजकीय पक्षाशी संबंध
व्यंकटी बुर्ले यांचा राजकीय पक्षाशी संबंध असल्याची नोंद तत्कालीन एसपी सुवेज हक यांनी डीजीपींना दिलेल्या पत्रात केली असल्याची माहिती बुर्ले यांनी यावेळी दिली.
सोमवारपासून जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषण
१९९५ पासून तर आतापर्यंत २० वर्षे न्याय व हक्क मिळण्यासाठी आपण प्रचंड पाठपुरावा केला. यात आपला वेळ व पैसा खर्च झाला. मात्र आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे आता अखेरचा पर्याय म्हणून ६ जुलै सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती व्यंकटी बुर्ले व पुष्पा गंदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.