गडचिरोलीतील चकमकीत जहाल नक्षलवादी सुखलालही ठार, मृत नक्षलींची संख्या २७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 22:01 IST2021-11-16T22:01:04+5:302021-11-16T22:01:28+5:30
Gadchiroli News छत्तीसगड सीमेवरील जंगलात शनिवारी झालेल्या ऐतिहासिक चकमकीत १६ लाखांचे बक्षीस शिरावर असलेला सुखलाल उर्फ रामसाय बिसराम परचापी हा जहाल नक्षली मारला गेल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.

गडचिरोलीतील चकमकीत जहाल नक्षलवादी सुखलालही ठार, मृत नक्षलींची संख्या २७
गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील जंगलात शनिवारी झालेल्या ऐतिहासिक चकमकीत १६ लाखांचे बक्षीस शिरावर असलेला सुखलाल उर्फ रामसाय बिसराम परचापी हा जहाल नक्षली मारला गेल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. चकमक झाली त्या ग्यारापत्तीच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान सुरू असताना त्याचा मृतदेह पोलीस पथकाच्या हाती लागला. कोरची दलममध्ये विभागीय समितीचा सदस्य (डीव्हीसीएम) असलेल्या सुखलालवर १६ लाखांचे बक्षीस होते. यामुळे चकमकीतील मृत नक्षलींची संख्या २७ झाली आहे.
दरम्यान, चकमकीत ठार झालेल्या आणखी ६ नक्षलींची ओळख पटविण्यात आली. त्यात कसनसूर दलमचा एसीएम अरुण उर्फ रामलू मडकाम (बक्षीस ६ लाख), विस्तार प्लाटून नं. ३ मध्ये पीएम म्हणून कार्यरत शांती (बक्षीस ६ लाख), कोरची दलमचा पीएम भीमा उर्फ अक्षय (बक्षीस २ लाख), मिलिंद तेलतुंबडेचा आणखी एक बॉडीगार्ड सोमडा उर्फ नरेश उईका (बक्षीस २ लाख), विस्तार प्लाटून नं. ३ चा पीएम संथिला (बक्षीस २ लाख) आणि पीएम मासे मडावी (बक्षीस २ लाख) यांचा समावेश आहे.