गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलीची गोळ्या झाडून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 13:47 IST2018-03-24T13:47:29+5:302018-03-24T13:47:41+5:30
नक्षल चळवळीतून पाच वर्षांपूर्वी बाहेर येऊन पोलिसांकडे आत्मसमर्पण केलेल्या युवकाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना धानोरा तालुक्यातील दराची या गावाजवळील जंगलात घडली.

गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलीची गोळ्या झाडून हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल चळवळीतून पाच वर्षांपूर्वी बाहेर येऊन पोलिसांकडे आत्मसमर्पण केलेल्या युवकाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना धानोरा तालुक्यातील दराची या गावाजवळील जंगलात घडली. विलास उर्फ तलवारशहा बाबुराव मडावी (२४) रा.नाडेकल, ता.कोरची असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नक्षल्यांच्या खोब्रामेंडा प्लाटून बी (५६) चा सदस्य असलेल्या तलवारशहाने २० मार्च २०१३ रोजी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते. त्यावेळी तो अवघा १९ वर्षाचा होता. आत्मसमर्पणानंतर सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न तो करीत होता. यादरम्यान त्याचे लग्नही झाले. सध्या तो आपल्या सासरवाडीला धानोरा तालुक्यातील दराची या गावी आला होता. तेथूनच शुक्रवारी रात्री काही नक्षलवाद्यांनी त्याला जंगलात नेले आणि गोळ्या झाडून हत्या केली. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह गावाजवळ आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. हे कृत्य नक्षल्यांच्या कोणत्या दलमने केले हे कळू शकले नाही.