मुख्यमंत्री सडक योजनेने दुर्गम रस्त्यांना नवसंजीवनी
By Admin | Updated: February 21, 2016 00:47 IST2016-02-21T00:47:42+5:302016-02-21T00:47:42+5:30
पंतप्रधान सडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सडक योजना २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे.

मुख्यमंत्री सडक योजनेने दुर्गम रस्त्यांना नवसंजीवनी
नियोजन पूर्ण : भामरागड, सिरोंचा, धानोरा व एटापल्ली तालुक्यांना प्राधान्य
गडचिरोली : पंतप्रधान सडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सडक योजना २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे. या योजनेतून आदिवासीबहुल भागातील २५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे जोडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, धानोरा व सिरोंचा या तालुक्यांमधील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील रस्ते निर्मितीला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान सडक योजनेच्या जिल्हा कार्यालयाने नियोजन केले असून त्याला शासनाची मंजुरीही मिळाली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षांपेक्षा कालावधी उलटला असला तरी अजूनही ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो गावे रस्त्याने जोडण्यात आली नाही. जी गावे रस्त्याने जोडण्यात आली आहेत, त्यांचीच डागडुजी करण्याचे काम शासनाकडून केले जात आहेत. दुर्गम व आदिवासीबहुल भागात रस्ते पोहोचले नसल्याने या भागाचा विकासही खुटला आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू केली. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, धानोरा व सिरोंचा हे चार तालुके आदिवासीबहुल आहेत. या तालुक्यांमधील बहुतांश गावे घनदाट जंगलाने व्यापली आहेत. यातील काही गावांपर्यंत अजूनही रस्ते पोहोचले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नियोजन करताना या तालुक्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. सद्यस्थितीत २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन वर्षांच्या नियोजनामध्ये एटापल्ली तालुक्यात आठ रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. एकूण ३८ किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत. भामरागड तालुक्यात चार रस्ते मंजूर आहेत. यातून आठ किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत. धानोरा तालुक्यात सहा रस्ते मंजूर आहेत. १७.९० किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत. सिरोंचा तालुक्यात २७ किमीचे चार रस्ते बांधले जाणार आहेत. या रस्त्यांमुळे १० पेक्षा अधिक गावे किमान आठमाही रस्त्याने जोडली जाणार आहेत. या रस्त्यांवरील पुलांचेही बांधकाम केले जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)