२५३ गावांना ‘नवसंजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:57+5:30

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे.

Navsanjivani to 253 villages | २५३ गावांना ‘नवसंजीवनी’

२५३ गावांना ‘नवसंजीवनी’

Next
ठळक मुद्देपावसाळापूर्व नियोजन : ७० टक्के गावांमध्ये पोहोचले चार महिन्यांचे धान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील २५३ गावांचा संपर्क तुटणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन करणे सुरू आहे. त्याअंतर्गत संबंधित गावातील नागरिकांसाठी नवसंजीवनी योजनेअंतर्गत चार महिन्यांच्या धान्य पुरवठ्याची सोय आधीच केली जात आहे. आतापर्यंत ७० टक्के गावांपर्यंत सदर धान्याचा पुरवठा झाला आहे.
पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. या ६ तालुक्यातील १२७ रेशन दुकानांमार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना गहू आणि तांदळाचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत जवळपास ८० दुकानांमध्ये हे धान्य पोहोचल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
पावसाळ्यात अनेक नदी-नाले भरभरून वाहतात. त्या नाल्यांवर पूल नसल्यामुळे नाल्यातून मार्ग काढत पलिकडच्या गावांमध्ये पोहोचणे कठीण होते. चारचाकी वाहन तर दूर, दुचाकी वाहनही चालू शकत नाही. यामुळे त्या गावांचा संपर्क तुटतो. अशावेळी तेथील नागरिकांना रेशनचा गहू आणि तांदूळ मिळावा म्हणून नवसंजीवनी योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना निर्धारित नियतव्ययानुसार चार महिन्यांचे धान्य एकाचवेळी दिले जाते. पावसाळ्यातील ही दैनावस्था दूर होण्याची प्रतीक्षा त्यांना आहे.

औषधीही पोहोचविणार
धान्यासोबत नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास गावातच औषधी मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये पुरेसा औषधीसाठा पुरविला जात आहे. अंगणवाड्यांमार्फत आहार पुरवठाही केला जात आहे.

११ हजार क्विंटल धान्य पुरविणार
अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील तांदूळ मिळून एकूण २३६४ क्विंटल गहू आणि ८६९४ क्विंटल तांदूळ पुरवठा केला जाणार आहे. दोन्ही प्रकारचे धान्य मिळून ११ हजार ५८ क्विंटल धान्य पुरवठा होणार आहे. त्यापैकी ७० टक्के माल रेशन दुकानांपर्यंत पोहोचला आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्याआधीच सर्व धान्यांचे वाटप लाभार्थ्यांना होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे यांनी सांगितले.

Web Title: Navsanjivani to 253 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.