नवोदय विद्यालयाच्या वनजमिनीचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:45+5:302021-09-19T04:37:45+5:30
शासनाच्या धोरणानुसार राज्य शासनाने विद्यालयासाठी लागणारी जवळपास १२ हेक्टर जमीन उपलब्ध करून द्यावी आणि केंद्र शासनाने उर्वरित संपूर्ण खर्च ...

नवोदय विद्यालयाच्या वनजमिनीचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
शासनाच्या धोरणानुसार राज्य शासनाने विद्यालयासाठी लागणारी जवळपास १२ हेक्टर जमीन उपलब्ध करून द्यावी आणि केंद्र शासनाने उर्वरित संपूर्ण खर्च करायचा आहे. मात्र घोट येथील विद्यालय ज्या जागेवर आहे ती जागा वनविभागाची आहे. त्या जागेच्या बदल्यात सुरुवातीला वन विभागाने आकारलेली एक कोटी ३३ लाख ७९ हजार ६६४ रुपये एवढी रक्कम ३१ मे २०१९ रोजी वनविभागाकडे भरण्यात आली. मात्र वनविभागाने ती जमीन नवोदय प्रशासनाकडे अद्याप हस्तांतरित केली नाही. दरम्यान, वन विभागाने १ सप्टेंबर २०२१ ला उपवनसंरक्षक आलापल्ली यांच्या पत्रानुसार पुन्हा दोन कोटी ३८ लाख ५२ हजार ३५२ रुपये एवढ्या अधिकच्या रकमेची मागणी केली आहे.
पालकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ओमप्रकाश साखरे, श्याम रामटेके, संदीप वरखडे, शैलेश पाथर्डे, डंबाजी पेंदाम, रमेश कुसणाके यांनी केले. त्यांना आशिष सोरते, रवींद्र वासेकर, मोरेश्वर भैसारे, भुपेश कुडवे आणि ॲड. नीलकंठ भांडेकर आदींनी सहकार्य केले.
(बॉक्स)
विविध सुविधांची कामे रखडली
मागील ३७ वर्षांपासून नवोदय विद्यालय ज्या जागेवर कार्यरत आहे ती जमीन शासनाने नवोदय प्रशासनाकडे सुपुर्द न केल्याने देशातील इतर नवोदय विद्यालयांप्रमाणे टप्पा २ आणि टप्पा ३ ची कामे येथे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. अजूनही हे विद्यालय टप्पा १ च्या बांधकामावरच रखडले आहे. केवळ जमीन हस्तांतरण प्रक्रिया रखडल्यामुळे मुला-मुलींचे नवीन वसतिगृह, नवीन मेस, नवीन शिक्षक निवासस्थाने, अंतर्गत रस्ते व इतर आवश्यक बांधकामे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संरक्षक भिंत बांधण्याचे काम वनविभागाने थांबवून दिले आहे.
(बॉक्स)
जीव मुठीत घेऊन राहतात ४८५ विद्यार्थी
अलीकडच्या काळात तर गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढून मानवावर हल्लेसुद्धा होत आहेत. नवोदय विद्यालय निवासी असल्याने आणि या विद्यालयाला संरक्षक भिंतही नसल्याने या विद्यालयात शिकणाऱ्या जवळपास ४८५ विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी हे नवोदय विद्यालय व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने पालकांच्या शिष्टमंडळाच्या भेटीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी आपण स्वतः लक्ष घालून हा तिढा सोडवू, असे आश्वासन दिल्याने पालकांची आशा पल्लवित झाली आहे.
180921\1533-img-20210918-wa0098.jpg
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतानाचे फोटो