देशी गायी, म्हशींना येणार ‘अच्छे दिन’
By Admin | Updated: March 27, 2015 01:10 IST2015-03-27T01:10:17+5:302015-03-27T01:10:17+5:30
देशी गायी, म्हशींच्या संरक्षणाकरिता तसेच जतन व संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर गुरे पैदास केंद्र राबविण्यात येणार आहे.

देशी गायी, म्हशींना येणार ‘अच्छे दिन’
आरमोरी : देशी गायी, म्हशींच्या संरक्षणाकरिता तसेच जतन व संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर गुरे पैदास केंद्र राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या दारातच त्यांच्या गायी, म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची प्रक्रिया करून नैसर्गिक संयोगाकरिता उच्च प्रतिचे वळू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेतून देशी वंशावळीचा ऱ्हास थांबविण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.
गुरे पैदास योजनेसाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला या संस्थेच्या संचालक मंडळास या प्रकल्पाची राज्यस्तरीय तांत्रिक व्यवस्थापन समिती म्हणून काम करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी व संनियंत्रण समिती गठित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त या समितीचे अध्यक्ष राहतील. सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विकास अधिकारी, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी, जिल्ह्यातील गो- पैदासकार संघटनेचा प्रतिनिधी तर समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त राहतील.
गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रम १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत २०१३ ते २०१७ पर्यंत राबविण्यात येत आहे. तसेच यामधील उर्वरित राहिलेल्या बाबी १३ व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये राबविण्यासत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत २०१४- १५ या वर्षात केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर ३०९ कोटींची तरतूद केली आहे. (प्रतिनिधी)